Sindhudurg Exam Enquiry : भुईबावडा परीक्षा केंद्रावरील दहा जणांची चौकशी

सात विषयांच्या उत्तरपत्रिकांमध्ये कॉपी उघडकीस : आता बचावासाठी धावाधाव
Sindhudurg Exam Enquiry
भुईबावडा परीक्षा केंद्रावरील दहा जणांची चौकशी
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथील आदर्श विद्यामंदिर हायस्कूल परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या केंद्रावर परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थ्याच्या तब्बल सात विषयांच्या मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांमधील हस्ताक्षरांमध्ये मोठी तफावत आढळली आहे. पेपर तपासणाऱ्या जागरूक शिक्षकांनी हा गैरप्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर शिक्षण मंडळाने (बोर्ड) याची गंभीर दखल घेतली.

मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेतील मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञानचे दोन आणि समाजशास्त्राचे दोन अशा एकूण सात विषयांच्या उत्तरपत्रिकांमध्ये ही तफावत उघड झाली आहे. याप्रकरणी बोर्डाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून, आता माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सखोल चौकशी सुरू आहे. यावेळी कर्तव्यावर असलेले पर्यवेक्षक प्रफुल्ल कांबळे, सुप्रसाद पांचाळ, प्रवीण पोतदार, विशाल पाटील, मिलिंद शेंडगे, जयवंत पाटील, रिलिव्हर संजयकुमार गाडे, स्टेशनरी सुपरवायझर नितीन जाधव यांच्यासह केंद्र संचालक व उपसंचालक अशा एकूण दहाजणांची चौकशी केली जात आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी पाटील यांच्या माहितीनुसार, उपशिक्षणाधिकारी संजय माने या प्रकरणाचा तपास करत असून, येत्या चार-पाच दिवसांत ते अहवाल सादर करतील.

विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकांमध्ये हा संशयास्पद प्रकार आढळला, त्याचे वडील जवळच्याच एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या संपूर्ण गैरप्रकारात त्या शिक्षकाचा नेमका सहभाग किती आहे, याचाही कसून तपास केला जात आहे. १२ मे २०२६ रोजी बोर्डाने दिलेल्या पत्राच्या आधारे शिक्षण विभागाकडून ही कारवाई केली जात आहे.

जागरूक शिक्षकांचे कौतुक

इंग्रजी पेपर तपासणारे परीक्षक युवराज कांबळे, नियामक डी. एस. साबणे तसेच समाजशास्त्र-१ परीक्षक करुणा बांद्रे व उत्तम कांबळे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पेपर तपासत हस्ताक्षरातील फेरफार तत्काळ बोर्डाला कळवली. त्यांच्या या सजगतेमुळेच हा मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, शैक्षणिक वर्तुळात त्यांचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news