Sindhudurg Rain : जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

कुडाळ तालुक्यात जोरदार वादळी वारे
Sindhudurg Rain
जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
Published on: 
Updated on: 

कुडाळ : कुडाळ शहरासह जिल्हाभरात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वादळी पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार वादळी वारे आणि विजांच्या प्रचंड कडकडाटाने नागरिकांमध्ये भीतीने काहीसा थरकाप उडाला. कुडाळ-वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी म्हापसेकर तिठा नजिक सुरूचे झाड रस्त्यावर पडून वाहतूक काही काळ ठप्प झाली. तसेच झाड पडल्याने तेथील चहा-वडापावच्या टपरीचेही नुकसान झाले. मात्र त्यावेळी रहदारी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. वीज तारा तुटून परिसरातील वीज पुरवठाही खंडीत झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, ऐन भातकापणीच्या हंगामात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

सायं. ४.३० वा. पासून जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ पाऊस बरसला. तर वीजांचा कडकडाट उशिरापर्यंत सुरू होता. शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांची धावपळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यालगतची घरे, दुकाने आणि निवारा शेडचा आसरा घेतला. छत्री किंवा रेनकोट नसलेल्या दुचाकीस्वारांसह फिरत्या विक्रेत्यांचीही मोठी तारांबळ उडाली.

वाऱ्याने बॅनर्स उडाले; एसटी चालकाचे प्रसंगावधान

कुडाळ शहरात लावलेले काही बॅनर्स जोरदार वाऱ्यामुळे उडाले, तर काही बॅनर्स फाटले. पोस्ट ऑफिस चौकात वाऱ्याने उडालेला एक बॅनर थेट मुख्य रस्त्यावर धावणाऱ्या एसटी बससमोर आला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबविल्याने संभाव्य धोका टळला. काही ठिकाणी रस्त्यालगत पावसाचे पाणी साचले. वादळी पावसामुळे वीज, इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा काही काळ विस्कळीत झाली होती.

जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जलसंधारणासाठी गावागावांत वनराई आणि कच्चे बंधारे उभारण्याची मोहीम सुरू आहे. या पावसामुळे बंधाऱ्यांमध्ये पाणी साठविण्यास मदत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या दृष्टीने हा पाऊस काहीसा दिलासादायक ठरू शकतो. दुसरीकडे, ग्रामीण भागात सध्या भातकापणीचा हंगाम सुरू आहे. अनेक ठिकाणी भातपीक कापणीस आले असून काही शेतकऱ्यांनी कापणी करून भात वाळत घातले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news