

मळगाव ः वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर-पाल मडकीलवाडी येथील उमेश सरमळकर याने आई वासंती सरमळकर हिचा बंदुकीची गोळी झाडून खुन केला. वेंगुर्ले पोलिसांनी त्याला शुक्रवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. उमेश याने आपल्याकडील 15 वर्षांपासून शिकारीसाठी वापरात असलेल्या बंदुकाचा वापर आईचा खून करण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले.
उमेश सरमळकर याने मकर संक्रांतीच्या रात्री आई वासंती सरमळकर हिच्यावर घराच्या छपरावर जात बंदुकीने गोळी झाढली. ही गोळी श्रीमती वासंती हिच्या वर्मी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
फॉरेन्सिक टीम नसल्यामुळे मृतदेहाची हेळसांड
वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाची शवविच्छेदन रूम दुरुस्तीच्या कामासाठी पाडण्यात आलेली असल्यामुळे मयत वासंती सरमळकर हिचा मृतदेह तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. तिथे सर्व शवविच्छेदन होऊ न शकल्यामुळे तिथून तो सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. तेथेही फॉरेन्सिक टीम नसल्यामुळे मृतदेह कोल्हापूर येथे सायंकाळी शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी 3.30 वा. मृतदेहाचे शवविच्छेदन करून 5.30 वा. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यामुळे तब्बल 22 तास मृतदेहाची हेळसांड झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शवविच्छेदन करण्यासाठी फॉरेन्सिक टीम नसल्यामुळे मृतदेहाची हेळसांड झाली. ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून आरोग्य विभागाचे तत्परता आणि कार्यक्षमता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. या प्रकाराबाबत मयत वासंती सरमळकर हिच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.