

कासार्डे : तळेरे येथील ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव संपन्न झाला. यावेळी आई खर्जा देवीची ओटी भरण्यासाठी माहेरवाशिणींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मुंबईस्थित ग्रामस्थांनीही या उत्सवात सहभागी होत ग्रामदैवताचे दर्शन घेतले.
दीपज्योतींनी मंदिर परिसर उजळून निघाला होता. उत्सवातील पारंपरिक पणत्या उजळवून त्यांची लूट करण्याची प्रथा यावेळी विशेष आकर्षण ठरली. बराच वेळ पेटलेल्या पणत्यांमधील तेल गरम झाल्याने त्या उचलताना युवा वर्गामध्ये चढाओढ पाहायला मिळाली. गरम पणत्या लुटण्यासाठी तरुणांनी केलेले प्रयत्न आणि त्यातील उत्साह पाहण्यासाठी ग्रामस्थ, महिला आणि माहेरवाशिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यानंतर श्री देव गांगेश्वरांची पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी निघाली. ढोल-ताशांच्या गजरात युवा वर्गाने मोठ्या उत्साहात पालखी नाचवली. पारंपरिक धार्मिक विधींनंतर ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे गाऱ्हाणी घातली. गावाच्या सुख-समृद्धीसह सुरक्षिततेसाठी श्री देव गांगेश्वराला साकडे घालण्यात आले.