

निर्णय राऊत
आंबोली : तब्बल एका महिन्याच्या विलंबानंतर आंबोली घाटातील मुख्य धबधबा अखेर मंगळवारी प्रवाहित झाला. यामुळे आंबोलीच्या वर्षा पर्यटन हंगामाची सुरुवात बुधवार, १ जुलै पासून सुरू होणार आहे. या क्षणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशभरातील असंख्य पर्यटकांसाठी ही खुशखबर आहे. पर्यटकांच्या सेवेकरिता पर्यटन व्यावसायिक सज्ज झाले असून यंदाचा आंबोली वर्षा पर्यटन हंगाम यादगार ठरणार आहे.
यावर्षी मान्सून जिल्ह्यात ६ जून रोजी दाखल झाला. त्यावेळी ३ ते ४ दिवस पाऊस कोसळला होता. त्यानंतर अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्याने जून महिना कोरडा गेला. मात्र, गेले दोन-तीन दिवस मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून आंबोली परिसरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आंबोली मुख्य धबधबा प्रवाहित झाला आहे. पावसाचा असाच जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसांतच 'मुख्य धबधबा' पूर्ण क्षमतेने प्रवाहित होणार आहे. आंबोली मुख्य धबधब्यासह घाटमार्गातील अन्य सर्व धबधबे, नांगरतास धबधबा तसेच बाबा धबधबा (चौकुळ - कुंभवडे) हे सुद्धा प्रवाहित झाले आहेत.
दरवर्षी साधारण जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आंबोली मुख्य धबधबा तसेच इतर धबधबे प्रवाहित होतात. मात्र, यंदा मान्सून वेळेत दाखल होऊनसुद्धा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस अपेक्षेप्रमाणे बरसला नाही. परिणामी, यावर्षी आंबोलीचे वर्षा पर्यटन सुमारे महिनाभर विलंबाने सुरू होत आहे.