

दोडामार्ग : घोटगेवाडी कॉजवेवरून तिलारी नदीत वाहून गेलेल्या दोघांपैकी सहा वर्षीय रेगण दिलीप बडा याचा मृतदेह २१ तासांच्या अथक शोधानंतर मंगळवारी दुपारी २.४५ वा. हाती लागला. घोटगे येथील पुलाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. मात्र, त्याच्यासोबत वाहून गेलेला अनुरंजन किसपोट्टा अद्याप बेपत्ता असून, त्याचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता.
घोटगेवाडी येथे राहणारे अनुरंजन किसपोट्टा हे रेगण बडा याच्यासोबत काही कामानिमित्त सोमवारी सायंकाळी कोनाळकट्टा येथे गेले होते. काम आटोपून दोघे परतत असताना कॉजवेवर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. काही कळण्याच्या आतच दोघेही पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सायंकाळी उशिरा घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अंधार पडल्याने प्रतिकूल परिस्थितीत शोधमोहीम राबविणे शक्य झाले नाही. त्यातच आवश्यक यंत्रसामग्रीचा अभाव असल्याने तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाला बाह्य मदतीची आवश्यकता भासली. अखेर सिंधुदुर्ग अडव्हेंचर रेस्क्यू टीम सांगेली-आंबोली यांना पाचारण करण्यात आले.
मंगळवारी सकाळपासून दोघांच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न
रेस्क्यू टीम मंगळवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाली. बोटींच्या सहाय्याने तिलारी नदीचे पात्र पिंजून काढण्यास सुरुवात केली. नदीचा प्रवाह, पाण्याची खोली आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बचाव पथकाने प्रयत्न सुरू ठेवले. अखेर दुपारी २.४५च्या सुमारास घोटगे येथील पुलाजवळ रेगण बडा याचा मृतदेह पथकाच्या हाती लागला. चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.
अनुरंजनचा शोध अद्याप सुरूच
रेगणचा मृतदेह सापडला असला तरी अनुरंजन किसपोट्टा याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीमसह तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नदीपात्रात अथक प्रयत्न करीत होते. शोध घेताना तहसीलदार राहुल गुरव बोटीतून आपल्या सोबत फिरत होते अशी माहिती रेस्क्यू टीमचे अध्यक्ष बाबल आल्मेडा यांनी दिली. सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. घोटगे येथून परमे व त्यानंतर कुडासेपर्यंत ही शोधमोहिम राबविण्यात आली
कार्यकारी अभियंत्यांच्या अनुपस्थितीवर ग्रामस्थ संतप्त
एवढी गंभीर दुर्घटना घडूनही तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील घटनास्थळी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी दुर्घटना घडल्यापासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.