

सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून येत्या एप्रिल 2025 पासून शेतकर्यांच्या शेतात थेट पाणी येईल, अशी माहिती जलसंपदा अधिकार्यांनी दिली आहे. त्यामुळे वैभववाडीतल्या निम्म्या गावांतील शेतकर्यांचे नशीब पालटून जाणार आहे.
अरुणा प्रकल्प हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा सहकार्याने होत आहे. पंतप्रधान सिंचन योजनेतून निधी मिळाल्याने केंद्रीय सचिव सतत आढावा घेत असतात.या प्रकल्पाचे काम फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यावेळी धरणाला गेट बांधून पाणी अडविले गेले आहे.धरणात सध्या 80 टक्के पाणीसाठा आहे.13 किलोमीटर लांबीचे मातीचे कालवे व 10 किलोमीटर लांबीचे नलिका प्रणालीद्वारे कालवे असे एकूण 23 कि.मी. लांबीचे कालवे असून त्याचे काम जवळजवळ 90 टक्के पूर्ण झाले आहे. सध्या एडगावात कालव्याचे अंतिम टप्यातील काम सुरू आहे. मोठ्या म्हणजे मेन लाईनच्या पाईपचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. त्यानंतर शेत जमिनीत जाणार्या दोन पोट पाईपलाईनची कामे हाती घेतली जाणार आहेत. शेतकर्यांच्या शेतात पाईपद्वारे पाणी देण्याचे नियोजन झाले आहे. ती कामे पुढे पूर्ण केली जाणार असून येत्या 3 महिन्यांत काम पूर्ण होईल, अशी माहिती जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे.
अरुणा प्रकल्पाचे पाणी नलिकाद्वारे पुरविण्यात येणार असल्याने त्याचा साठा मुबलक असणार आहे. त्यामुळे ते पाणी आजूबाजूच्या गावाला द्या असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे अरुणा प्रकल्पाच्या जादा पाण्याचे वितरण वायंबोशी आणि सांगुळवाडीतील काही गावांना करण्याबाबत विचार झाला आहे. नलिकाद्वारे पुरविण्यात येणारे पाणी हे ग्रॅव्हिटी बेसिसने पुरवठा होत आहे. एडगावपर्यंतचा भाग हा तळाला आणि सांगुळवाडीचा भाग उंच असल्याने त्या गावाला पाणीपुरवठा करण्याबाबत तांत्रिक अडचण आहेत. त्यासाठी एका संस्थेने याबाबत एक सर्व्हे केला असून सांगुळवाडी भागात मोठमोठ्या विहीर बांधून शेतीला पाणी देण्याचा विचार असल्याची माहिती जलसंपदा खात्याच्या अधिकार्यांनी दिली.
हेत, मागवली, वेंगसर,उपळे,अजिवली,मठ, कोळपे, भुईबावडा, तिरवडे, कुसूर, उंबर्डे, सोनाळी, एडगाव, वायंबोशी व राजापूर तालुक्यातील काही गाव आदी 15 गावात पाण्याची गंगा वाहणार आहे.5310 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.या प्रकल्पाच्या कामाला एकूण 1800 कोटी रुपये खर्च होणार आहे. अरुणा मध्यम सिंचन प्रकल्प हा भोम,आखवणे या गावात उभारला आहे.
कालव्याच्या बांधकामाच्या लाईनमध्ये अडथळा ठरणार्या वृक्षांचे मूल्याकंन झालेले असून कुसूर, सोनाळी गावातील शेतकर्यांना भरपाई दिली गेली आहे. एडगावातील शेतकर्यांना येत्या महिन्यात पैशाचे वाटप केले जाणार असल्याचे संबंधितांनी सांगितले.