

वैभववाडी : ‘शिवसेनेचा एकच एल्गार... स्मार्ट मीटर हद्दपार!’, ‘गॅसचा भडका, तेलाची आग... झोपलेल्या सरकारला आता तरी जाग!’, ‘या सरकारचं करायचं काय... खाली डोकं वर पाय!’ अशा आक्रमक घोषणांनी बुधवारी वैभववाडी शहर दणाणून गेले. ‘स्मार्ट मीटर’ सक्ती आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ उबाठा शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत सरकार आणि प्रशासनाला विविध प्रश्नांवर धारेवर धरले.
शिवसेना कार्यालयातून निघालेला मोर्चा संभाजी चौक, दत्तमंदिरमार्गे तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चा महावितरण कार्यालयावर नेण्यात आला. हातात बॅनर व फलक घेऊन कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत-पालव, माधवी दळवी, तालुकाप्रमुख नंदू शिंदे यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोर्चेकऱ्यांनी नायब तहसीलदार यांची भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. गेल्या वर्षी प्रत्येक रेशनकार्डधारकाला ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आला होता. यावर्षी त्याचे वाटप होणार का? असा सवाल वैभव नाईक यांनी केला. यावर यावर्षी आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार नसल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. यावर सुशांत नाईक म्हणाले, आता कोणत्या निवडणुका नाहीत का? आता वैभववाडी नगरपंचायतीची निवडणूक आहे ना? असा खोचक सवाल केला. रेशनकार्डधारकांची गैरसोय टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरित करण्याची मागणी करण्यात आली. गणेशोत्सव काळात गॅस ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व गॅस एजन्सींना आवश्यक सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. वाढती महागाई व इतर मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे वैभव नाईक यांनी प्रशासनाला सांगितले.
वैभववाडी तालुक्यात ३० टक्के ‘स्मार्ट मीटर’
यानंतर मोर्चा महावितरण कार्यालयावर पोहोचला. यावेळी स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून महावितरणच्या अभियंत्यांना आंदोलनकर्त्यांनी धारेवर धरले. मुख्यमंत्री ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नसल्याचे सांगतात, मात्र प्रत्यक्षात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी आला. वैभववाडी तालुक्यात आतापर्यंत ३० टक्के स्मार्ट मीटर बसविल्याचा दावा करत सुशांत नाईक यांनी या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला. जेव्हा आदानीचे शंभर टक्के स्मार्ट मीटर बसविले जातील, तेव्हा महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचे काय होणार? असा सवाल त्यांनी केला.
उबाठा शिवसेना महिला तालुकाप्रमुख दिव्या पाचकुडे, कणकवली महिला आघाडी प्रमुख माधवी दळवी, तालुका सचिव गुलजार काझी, संघटक लक्ष्मण रावराणे, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, अशोक रावराणे, मनोज सावंत, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, स्वप्नील रावराणे, वसंत खानविलकर, जितू तळेकर, यशवंत गवाणकर, अर्चना कोरगावकर, संतोष पाटील, पंढरी सुर्वे, सुरेश पांचाळ, सुरेश शिंदे, अनंत नादलसकर, समीर लांजेकर, दादा नेवरेकर, अहमद बोबडे, दिलीप रावराणे, मानसी घुघरे, रिहाना काझी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.