Sindhudurg Crime : चिमुकलीवर अत्याचाराचा आरोप; शिक्षक बापाला अटक

पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा; चार दिवसांची पोलिस कोठडी
girl abuse case
girl abuse caseFile Photo
Published on: 
Updated on: 

वैभववाडी : साडेचार वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर तिच्याच शिक्षक बापाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वैभववाडी तालुक्यातील एका गावात शुक्रवारी घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने वैभववाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध बलात्कार व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा आरोपीला अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक हा तालुक्याबाहेरील रहिवासी असून सध्या वैभववाडी तालुका मुख्यालयाजवळील एका गावात वास्तव्यास आहे. त्याचे यापूर्वी दोन विवाह झाले असून दोन्ही पत्नी त्याच्यासोबत राहत नाहीत. सन २०२० मध्ये त्याने तिसरा विवाह केला असून त्यांना साडेचार वर्षांची मुलगी आहे.

आरोपी व त्याच्या पत्नीमध्ये सातत्याने कौटुंबिक वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या वादामुळे पत्नी सुमारे दोन वर्षे माहेरी राहत होती. जून २०२६ मध्ये ती पुन्हा पतीसोबत राहण्यास आली होती. मात्र, त्यानंतरही दोघांमधील वाद सुरूच होते.

शुक्रवारी पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर पत्नी काही वेळासाठी घराबाहेर गेली होती. याच दरम्यान आरोपीने आपल्या साडेचार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. त्यानंतर तिने शुक्रवारी सायं. उशिरा वैभववाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला रात्री उशिरा अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उल्हास जाधव करीत आहेत. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.