Sindhudurg News : यावर्षी 'सुरंगी' कळी उत्पादन फक्त १५ टक्के!

बदलत्या वातावरणाचा परिणाम; शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान
Sindhudurg News
'सुरंगी' कळी उत्पादन फक्त १५ टक्के!
Published on
Updated on

एस. एस. धुरी

आरवली : बदलत्या हवामानाचा फटका आंबा व काजू फळांच्या उत्पादनावर झाला असतानाच सुरंगी फुलांच्या उत्पादनावर या हवामानाचा विपरीत परिणाम झाला आहे. यावर्षी सुरंगी फुलांच्या उत्पादनात विक्रमी ८५ टक्के एवढी घट झाली आहे. साहजिकच या कळ्यांची व फुलांची विक्री करून उदरनिर्वाह करणार्‍या शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील शेतकरी आंबा, काजू, नारळ, कोकम या उत्पादनांबरोबरच जंगलात नैसर्गिकरित्या उत्पादित सुरंगी कळ्यांची विक्री करण्याचा व्यवसाय करतात. या कळ्यांना बाजारात चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांना बर्‍यापैकी आर्थिक फायदा मिळतो. वेंगुर्ले तालुक्यातील आसोली, आरवली, सोन्सुरे, खानोली, वायंगणी, दाभोली, मोचेमाड आदी गावांमध्ये सुरंगी कळी तोडण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.

सुरंगी कळी (न उमललेली फुले) व फुले यांना आयुर्वेदिक औषध निर्मिती तसेच अत्तर निर्मिती उद्योगात मोठी मागणी आहे. सुरंगी फुलांमध्ये असलेला सुगंध इतर फुलांच्या सुगंधापेक्षा वेगळा आहे. या फुलांपासून वेगवेगळी सुगंधी अत्तरे, सुगंधी साबण, सुगंधी द्रव्ये बनविली जातात. त्यामुळे या फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. स्थानिक घाऊक व्यापारी शेतकर्‍यांकडून सुकविलेले सुरंगीचे कळे व फुले विकत घेतात आणि मुंबई व पुणे येथे विकतात. हे सुरंगीचे कळे विकून येथील शेतकरी बर्‍यापैकी अर्थार्जन करतात.

सध्या सुरंगीच्या सुकविलेल्या कळ्यांना प्रतिकिलो ८०० रुपये तर सुकविलेल्या फुलांना १०० रुपये दर मिळत आहे. यावर्षी लांबलेला पाऊस आणि बदलते हवामान यांचा दुष्परिणाम सुरंगी कळी उत्पादनावर झाला आहे. सुरंगी कळ्यांचे उत्पादन घेण्यासाठी कीटकनाशकांच्या फवारण्या, रासायनिक खते यांचा वापर करावा लागत नाही, हे जरी खरे असले तरी सुरंगी कळे झाडावरून काढण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. हे कळे काढण्यासाठी ताडपत्र्या व प्लास्टिक शीटचा वापर करतात. झाडाच्या फांद्या जाड दोरीने बांधून सुरंगीचे कळे काढतात. सुरंगी वृक्षाच्या फांद्या कमजोर असल्यामुळे काहीवेळा फांदी तुटून कळी काढणारा कामगार जखमी किंवा जायबंदी होतो. त्यामुळे हे काम मोठ्या शिताफीने करावे लागते.

या कामगारांना प्रतिदिन १००० रूपये मजुरी द्यावी लागते. दमट हवामानामुळे झाडावरील कळ्यांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो. या कळ्यांची काढणी योग्य वेळेत होणे आवश्यक असते. तरच त्यांचे योग्य वजन टिकून फायदा मिळू शकतो. सुरंगीच्या फुलांपासून तयार केलेल्या वळेसरालाही स्थानिक बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असून हा दर ८० रूपये ते १०० रूपये प्रती वळेसर एवढा असतो. ग्रामीण भागात स्त्रिया हा व्यवसाय करतात.

अधिकाधिक शेतकरी हे कळे काढून, उन्हात वाळवून ते विक्रीसाठी नेतात. कळ्यांची काढणी केल्यावर त्यांची व्यवस्थित हाताळणी होणे गरजेचे आहे. कळे काढल्यानंतर ते व्यवस्थित ठेवले नाहीत तर ते काळे पडून त्यांची प्रत खालावण्याची शक्यता असते . त्यामुळे ते वाळवून व्यवस्थित पोत्यांमध्ये भरून ठेवले जातात. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू होणारे सुरंगी कळ्यांचे उत्पादन बदलत्या हवामानामुळे यंदा मार्च महिन्याच्या मध्यावर आले आहे. एकीकडे उत्पादन घटले असताना दराचा चढ उतारही शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान करणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news