Sindhudurg News : एसटी कामगार संघटनेची विभागीय कार्यालयासमोर निदर्शने

थकबाकीचा हप्ता न मिळाल्याने केले आंदोलन
Sindhudurg News
एसटी कामगार संघटनेची विभागीय कार्यालयासमोर निदर्शने
Published on
Updated on

कणकवली ः एसटी कामगारांना मूळ वेतनात दिलेल्या 6500 रु. च्या वाढीनुसार देय होणारी थकबाकीची रक्कम समान 48 हप्त्यात नोव्हेंबर 2025 देय डिसेंबर 2025 च्या मासिक वेतनासोबत अदा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार कामगारांना थकबाकीचा हप्ता मासिक वेतनासोबत मिळत होता; मात्र जानेवारी 2026 देय फेब्रुवारी 2026 च्या वेतनामध्ये सदर थकबाकीचा हप्ता न मिळाल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याबाबत परिवहन मंत्र्यांनी आश्वासन देवूनही 12 फेब्रुवारीपर्यंत फरकाचा हप्ता न दिल्याने गुरुवारी राज्यभरात एसटी कामगार संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली. कणकवलीत विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप साटम, विभागीय उपाध्यक्ष विनय राणे, विभागीय कार्यशाळ सचिव दिनेश रासम, अध्यक्ष रमेश माने, अतुल बागवे, गिरीश कांबळे, विभागीय कार्यालय सचिव अमिता राणे, दत्ता मराठे, सुप्रिया भाटले, उमेश बोभाटे, सुभाष बोडके, वैभव कदम, अरविंद कदम आदी उपस्थित होते. याबाबतची माहिती देताना केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप साटम म्हणाले, एसटी कामगारांना दरमहा वाढीव हप्त्यासह मिळणारे वेतन विचारात घेवूनच ते आपले नियोजन करतात. आता या वेतनात वाढीव हप्ता न मिळाल्याने त्यांचे नियोजन कोलमडून पडले आहे. कामगारांमध्ये निर्माण झालेल्या या नाराजी बाबत पर्यटन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्याशी 7 फेब्रुवारी रोजी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता सदर थकबाकीच्या 120 कोटीच्या रकमेची फाईल मंत्रालयात सादर केलेली आहे. मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सदर फाईलवर मंजूर घेण्यात येईल व तातडीने कामगारांना फरकाच्या रकमेचे वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनानुसार गुरुवारपर्यंत थकबाकीचा हप्ता न मिळाल्याने निदर्शने करण्यात आल्याचे दिलीप साटम यांनी सांगितले. पूणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. शासन, प्रशासनाला एसटी कामगारांना नियाधिन देय रक्कम देताना नेहमीच अडचणी येतात मात्र खाजगी कंत्राटदारांची बिले वेळीच अदा करताना अडचणी येत नाहीत. हा फक्त एका हप्त्याचा प्रश्न नाही तर कामगारांच्या विश्वासाचा, सन्मानाचा आणि हक्काचा प्रश्न असल्याचे दिलीप साटम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news