

कणकवली ः यंदा गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने कोकणात आलेल्या चाकरमान्यांनी रेल्वेबरोबरच एसटीलाही मोठी पसंती दिली आहे. मंगळवारी गौरी- गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सूरू होणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग एसटी विभाग सज्ज झाला आहे. आतापर्यंत परतीसाठी 268 गाड्यांचे बुकींग झाले असून 8 सप्टेंबरपर्यंत हा आकडा 350 पर्यंत जाण्याचा अंदाज सिंधुदुर्ग एसटी विभागीय कार्यालयातील विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
यंदा सिंधुदुर्गात सुमारे 1200 हून अधिक एसटी बसेस चाकरमान्यांना घेऊन आल्या. आता परतीच्या प्रवासासाठीही चाकरमान्यांनी एसटीला पसंती दिली आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग विभागाकडून परतीच्या प्रवासाचे आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. परतीच्या प्रवासाबाबत माहिती देताना विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख म्हणाले, यंदा गतवर्षीच्या तुलनेत जादा गाड्या बुकींगची संख्या अधिक आहे. गतवर्षी परतीसाठी 264 गाड्यांचे बुकींग झाले होते. तर यंदा आतापर्यंत 268 गाड्या बुक झाल्या असून हा आकडा 8 सप्टेंबर पर्यंत सुमारे 350 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. परतीच्या प्रवासासाठी राज्यातील इतर विभागाच्या 146 गाड्या सिंधुदुर्गात आल्या आहेत. बुकींग तारखेनूसार परतीच्या प्रवासाच्या गाड्या सोडल्या जात आहेत. सोमवारी 10 जादा गाड्या रवाना झाल्या. मंगळवारी 21 जादा गाड्या तर बुधवारी सर्वांधिक 120 गाड्या चाकरमान्यांना घेऊन मुंबईला जाणार आहेत. गुरूवारी 74 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत तर 5, 6 सप्टेंबरला प्रत्येकी 5,6 गाड्या आणि अनंतचतुर्थीदशी नंतर म्हणजेच रविवार 7 सप्टेंबरला जवळपास 35 जादा गाड्या मुंबईला जाणार आहेत. अर्थात ही आजची स्थिती असून यामध्ये 8 सप्टेंबर पर्यंत आणखी वाढ अपिक्षेत असून जवळपास 350 पर्यंत गाड्या बुक होतील असा विश्वास विक्रम देशमुख यांनी व्यक्त केला.
यंदा एसटी महामंडळाच्या ग्रुप बुकींगलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रुप बुकींगमुळे त्या - त्या गावातूनही जादा गाड्यांची सोय परतीच्या प्रवासासाठी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर रेल्वेने जादा गाड्या सोडूनही एसटीला प्रवाशांनी मोठी पंसती दिल्याने सिंधुदुर्ग विभागाला गणपती बाप्पा पावला आहे.