

मालवण : वेंगुर्ला ते मालवण येणाऱ्या एसटी बसमधून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने कुपेरी घाटी येथे प्रवाशांमध्ये घबराट उडाली. गुरुवारी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने घाबरलेल्या एका महिला प्रवाशाने खिडकीतून बाहेर उडी मारली. यात ती जखमी झाली. याच मार्गावरून प्रवास करणारे आरोग्य सेवक लक्ष्मण नातेवाड यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी महिलेला मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मालवण येथील ही युवती कुडाळ येथे कामाला जाते. गुरुवारी सायंकाळी ती कुडाळहून मालवणकडे येण्यासाठी बसने निघाली होती. दरम्यान, काळसे होबळीचा माळ येथे तिची बस बंद पडली. त्यामुळे त्या बसमधील प्रवाशांना मागून येणाऱ्या वेंगुर्ला-मालवण बसमध्ये बसविण्यात आले. ही बसही सीएनजीवर चालणारी असल्याने त्यामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
ही बस पेंडूर मार्गे मालवणकडे येत असताना कुपेरी घाटीतील चढावावर अचानक मोठा आवाज झाला. त्यानंतर बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. बसची शक्तीही कमी झाल्याने चालकाने खबरदारी म्हणून बस थांबवून इंजिन बंद केले आणि स्विच बंद केला. मात्र, धूर येतच असल्याने बसला आग लागण्याची भीती प्रवाशांना वाटू लागली. बस प्रवाशांनी खचाखच भरलेली असल्याने बाहेर पडण्यासाठी दरवाजाजवळ एकच गर्दी झाली. याच गोंधळात मागील बाजूस असलेल्या एका महिला प्रवाशाने घाबरून खिडकीतून उडी मारली. यावेळी अन्य काही प्रवाशांनीही खिडकीतून बाहेर उड्या मारल्याची चर्चा होती. मात्र, इतर कोणाला दुखापत झाली का, याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.