

मळगाव : रेडी येथील जंगलमय परिसरात आढळून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. हा अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दारूच्या नशेतील सततच्या मारझोडीला कंटाळून पोटच्या दोन मुलांनीच वडिलांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना आरोंदा येथून ताब्यात घेतले.
१० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वा.च्या सुमारास वेंगुर्ला-रेडी येथील जंगलात पुरुषाचा अनोळखी मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलिस ठाणे आणि वेंगुर्ला पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, रेल्वे विभागाकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटवली. मृत व्यक्तीचे नाव दाऊद मुसाफीर शेख (वय ५६, मूळ रा. पूर्वी चंपारण, बिहार) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ही क्लिष्ट आणि गुंतागुंतीची कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर व अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, जि.वि.शा. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सहा. निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या पथकाने पार पाडली.