

आंबोली पर्यटनाचे आकर्षण दिवसेंदिवस पर्यटकांमधे वाढत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून आंबोलीत आगळ्या व वेगळ्या ‘सोलो पर्यटना’ची क्रेझ वाढली आहे. वर्षभरात हजारो पर्यटक आंबोलीत या पर्यटनाचा आनंद घेत आहेत.
जैवविविधतेने परिपूर्ण आंबोली हे पर्यटनस्थळ काही वर्षापूर्वी दुर्लक्षित होते. वर्षा पर्यटन हा एकमेव ट्रेंड प्रसिद्द होता. उर्वरीत आठ महिन्यात आंबोलीचे पर्यटन शून्य होते. मात्र गेल्या काही वर्षात आंबोलीच्या पर्यटनाची झालेली प्रसिद्धी यामुळे आंबोलीत आता बारमाही पर्यटन सुरू झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारचे रोजगारही उपलब्ध झाले आहेत. दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक आंबोलीला भेट देत आहेत.
आंबोलीच्या पारंपारिक वर्षा व निसर्ग पर्यटनासह साहसी पर्यटन, वन्यजीव पर्यटन, कृषि पर्यटन, नाईट पर्यटन असे पर्यटनाचे विविध प्रकार विविध संस्थांनी सुरू केले आहेत. यात आणखी एका विशेष पर्यटन प्रकाराची भर पडली आहे ती ‘सोलो पर्यटन’ (एकट्याने केलेली निर्सग भ्रमंती)
आंबोलीतील ‘सोलो पर्यटन’ हे बारमाही चालते. विशेष म्हणजे प्रत्येक ऋतू नुसार यात वेगळेपण असते. सोलो पर्यटनाच्या माध्यमातून आंबोलीतील जैवविविधतेचा अनुभव घेतानाच निसर्गाच्या सानिंध्यात राहून ताण-तणावातून मुक्त होण्याचा अनुभव घेता येतो. नेचर मेडिटेशन, स्वतःची शारीरिक व मानसिक क्षमता तपासून पाहणे, निर्सगाची विविध आव्हाने स्वीकारने, जंगलातून एकट्याने भट़़क़ण्याचा थ्रील व रोमांच अनुभवता येतो. या बरोबरच वन्यजीव (प्राणी व पक्षी) निरक्षण, पायांच्या ठश्यांवरून प्राणी ओळखणे, जंगल मचान, नेचर ट्रेल, नाईट सफारी, जंगल सफर, वन्यजीव फोटोग्रॉफी आदींचा अनुभवही मोकळेपणाने घेता येत आहे.