

देवगड : दिवाळीच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या पर्यटक आणि भाविकांनी दक्षिण काेकणची काशी म्हणून प्रसिद्ध श्रीक्षेत्र कुणकेश्वर गजबजले आहे. कुणकेश्वर दर्शनासाठी भाविकांची माेठी गर्दी झाली असून कुणकेश्वरबराेबरच देवगडमधील इतर पर्यटनस्थळेही पर्यटकांनी गजबजुन गेली आहेत.
दिवाळी सणाचे चार दिवस संपल्यानंतरही पर्यटनाचा उत्साह कायम आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या पडल्याने महाराष्ट्राच्या विविध भागांतून काैटुंबिक सहलींसाठी पर्यटक काेकणात दाखल हाेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड आणि परिसरातील पर्यटनस्थळांना पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे. देवगड तालुक्यातील लाॅजिंग आणि हाॅटेल्स पर्यटकांनी गजबजलेले पाहायला मिळत आहे.
या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ वयाेवृद्ध तसेच दिव्यांग भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली ‘स्टेअर चेअर’ सुविधा विशेष काैतुकाचा विषय ठरत आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या वयाेवृद्ध भाविकांना पायऱ्या चढणे-उतरणे त्रासदायक ठरू नये आणि त्यांनाही सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांना या सुविधेमुळे माेठा दिलासा मिळत असून, त्यांचे दर्शन अधिक सुलभ हाेत आहे. देवस्थान ट्रस्टने केवळ धार्मिक पर्यटनाचा विचार न करता ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांच्या साेयी-सुविधांचीही याेग्य काळजी घेतल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त हाेत आहे. भाविकांच्या गर्दीचे याेग्य नियाेजन आणि सर्वांना सुलभ दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या देवस्थान ट्रस्टच्या या उपक्रमाचे भाविकांकडून काैतुक हाेत आहे.