

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत प्रशासनाने कडक भूमिका घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांना थेट कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने ही कार्यमुक्तची कारवाई केली आहे.
पूर्वपरवानगी न घेता वैद्यकीय रजेवर गेल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असून, प्रशासनातील शिस्त न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांना हा इशारा दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी तसे आदेश जारी केले आहेत. जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार, कविता शिंपी या 25 मार्च 2026 पासून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वैद्यकीय कारणावरून रजेवर गेल्या होत्या.
थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला
कविता शिंपी यांनी वैद्यकीय रजा पूर्ण करून 27 एप्रिल रोजी पुन्हा पदावर रुजू झाल्याचा अहवाल सादर केला. मात्र, त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना लगेचच एकतर्फी कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे त्या रुजू होताच त्यांना पदाचा कार्यभार मिळण्याऐवजी थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील आदेश येईपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार विनायक पाटील यांच्याकडेच कायम ठेवण्यात आला आहे.