Sindhudurg Mini Kashmir : सिंधुदुर्गच्या ‘मिनी काश्मीर’ वर धनाढ्यांची नजर

शिरशिंगेतील जैवविविधतेने नटलेली जमीन हडपण्याचा डाव : ग्रामस्थांचा आरोप
Sindhudurg Mini Kashmir
Sindhudurg Mini Kashmir
Published on
Updated on

सावंतवाडी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावातील जैवविविधतेने नटलेली अब्जावधी रुपयांची सामाईक जमीन हडपण्याचा मोठा डाव काही धनाढ्य दलाल आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील सर्व्हे नं. ३२, ३३, ३४, २० आणि ९९ या सामाईक क्षेत्रातील जमिनी बेकायदेशीरपणे खरेदी-विक्री करून हडपण्याचा प्रयत्न केला जात असून, या पार्श्वभूमीवर येत्या २० मे रोजी प्रशासनाकडून होणारी जमीन मोजणी कोणत्याही परिस्थितीत उधळून लावण्याचा निर्धार शिरशिंगे येथील ग्रामस्थ, तरुण आणि चाकरमान्यांनी केला आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.

शिरशिंगे गावातील एकूण क्षेत्रापैकी तब्बल ८० टक्के भाग हा जैवविविधतेने नटलेला आहे. यामध्ये सर्व्हे नं. ३२/१/ब हा आकाराने व क्षेत्राने सर्वात मोठा असून, त्याचे एकूण क्षेत्र ६९१.८५.०० हेक्टर आर. इतके विस्तृत आहे. या संपूर्ण मिळकतीमध्ये जवळजवळ ८५० हून अधिक सहभागधारकांची एकत्र आणि अविभक्त अशी सामाईक मालकी व प्रत्यक्ष कब्जाभोग वहिवाट आहे. हा परिसर कोल्हापूर जिल्ह्यातील कितवडे गावची सीमा आणि सावंतवाडी तालुक्यातील गेळे (कावळेसाद पॉईंट) या दरम्यान येत असल्याने निसर्गसौंदर्य आणि घनदाट जंगलाने समृद्ध आहे. याच निसर्गरम्य आणि मोक्याच्या जागेवर आता काही बड्या दलालांची नजर पडली आहे. या भूमाफियांनी महसूल विभाग आणि संबंधित खात्यातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गरीब, अशिक्षित शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखवले आहे. त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेत ही सामाईक जमीन राजरोसपणे खरेदी केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित महसूल खात्याकडून ही खरेदीखते नोंदवताना इतर कोणत्याही कायदेशीर सहभागधारकांना किंवा सहधारकांना कोणतीही पूर्वसूचना अथवा कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नाही. नियम धाब्यावर बसवून ही खरेदीखते मारली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या बेकायदेशीर व्यवहारांविरोधात शिरशिंगे ग्रामस्थांनी वारंवार संबंधित शासकीय यंत्रणेला निवेदने देऊन दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, धनाढ्य एजंट आणि शासकीय यंत्रणेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कायदेशीर पळवाटा शोधत आणि पैशाचा वारेमाप वापर करत २-३ दिवसांवर आलेल्या म्हणजेच २० मे २०२६ रोजी या जमिनीची मोजणी करण्याचा घाट घातला आहे. संपूर्ण गावाचा या मोजणीला तीव्र विरोध आहे.गावातील बैठकीत हा मोजणीचा डाव पूर्णपणे उधळून लावण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. बाहेरील एजंट आणि दलालांना गावात पाऊल टाकू न देण्याचा आणि या संपूर्ण प्रकरणाच्या मागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्याचा ठराव ग्रामस्थांनी केला आहे. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि २० मे रोजी होणारी मोजणी रोखण्यासाठी गावातील तरुण, ग्रामस्थ आणि मुंबई-पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्या चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने गावात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निवेदन देताना शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, माजी सरपंच नारायण राऊळ, माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ, जीवन लाड, सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे, गजानन राऊळ, रामचंद्र भिंगारे, चंद्रकांत परब आणि अमित राऊळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news