Sindhudurg News : चाकरमान्यांच्या परती प्रवासासाठी सावंतवाडी आगाराकडून जादा एसटी गाड्यांचे नियोजन

गणेशोत्सवाची सांगता होताच चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू
Sindhudurg News
चाकरमान्यांच्या परती प्रवासासाठी सावंतवाडी आगाराकडून जादा एसटी गाड्यांचे नियोजन
Published on: 
Updated on: 

हरिश्चंद्र पवार

सावंतवाडी : गणेशोत्सवाची सांगता होताच चाकरमान्यांचा आणि गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या सावंतवाडी आगाराकडून जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. गणेश व गौरी विसर्जनानंतर मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असल्याने एसटी महामंडळाने प्रवाशांच्या मागणीनुसार अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

सावंतवाडी आगाराकडून १९ ते २२ सप्टेंबर या कालावधीत परतीच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण व ग्रुप बुकिंगला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या चार दिवसांच्या कालावधीत एकूण २५० हून अधिक प्रवाशांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये शनिवारी २ बोरिवली गाड्या रवाना झाल्या, तर रविवारी ३ बोरिवली आणि २ पुणे गाड्या सोडण्यात आल्या. सोमवार २१ सप्टेंबर रोजी ३ पुणे आणि २ बोरिवली गाड्या बुक झाल्या आहेत. दरम्यान, सावंतवाडी एसटी आगाराला प्राप्त जादा गाड्यांपैकी १८ गाड्या लांजा डेपोला आणि ७ गाड्या कणकवली डेपोला वर्ग करण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवानिमित्त सावंतवाडी तालुक्यात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल झाले होते. आता परतीचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित व्हावा यासाठी आगार प्रशासनाकडून सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. प्रवाशांनी गर्दीच्या वेळी गैरसोय टाळण्यासाठी आगाऊ आरक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी एसटी आगार प्रमुख गौतमी कुबडे व राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news