

सावंतवाडी : गुजरात ते गोवा जाणार्या टेम्पो ट्रॅव्हलरची डंपरच्या मागच्या चाकाला जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हलर चालकांसह आतील पर्यटक मिळून सातजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी पहाटे 5 वा.च्या सुमारास झाराप-पत्रादेवी महामार्गावर मळगाव- जोशी मांजरेकरवाडी येथे झाला. जखमींना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर चालक विजयकुमार झापडी (वय 35, रा. सुरत) हा गंभीर असल्याने त्याला गोवा-बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
टेम्पो ट्रॅव्हल्स चालक विजयकुमार झापडी हा सुरत -गुजरात येथील पर्यटकांना गोवा दर्शनासाठी मुंबई-गोवा महामार्गाने घेऊन जात होता. सोमवारी सकाळी तो मळगाव- जोशी मांजरेकरवाडी या परिसरात आला असता त्याला डुलकी लागली. यात त्याचा गाडीवरील ताबा सुटून टेम्पो ट्रॅव्हलर समोरील उभ्या डंपरला मागून धडकला. ही धडक एवढी जोरदार होते की डंपरची मागील चारी चाके तुटून वेगळी झाली. डंपरला धडक बसल्यानंतर ट्रॅव्हल्स बाजूच्या झाडाला जाऊन धडकली. या अपघातात चालकाचे हात आणि पाय जायबंदी झाला तर आतमधील लहान मुलांसह सहा पर्यटकही जखमी झाले. यामध्ये मयूर मालविय (35), चंद्रिका मालविय (37), बन्सी मालविय (21), हित मालविय (10), किरीट मालविय (42) यांचा समावेश आहे.
दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी गेलेले ग्रामस्थ संजय जोशी, बाळा अरविंदेकर, सुनील निंबळेकर, दीपक जोशी, सचिन मांजरेकर, प्रणव मांजरेकर, गणेश जोशी, रिक्षाचालक सुहास पेडणेकर यांनी 108 अॅम्बुलन्सला फोन करत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. याबाबतची माहिती ‘सामाजिक बांधिलकी’ संघटनेचे रवी जाधव तसेच लक्ष्मण कदम यांना समजताच त्यांनी अपघातग्रस्तांना उपचार करण्यासाठी हालचाल केली.
सामाजिक बांधिलकीचे सतीश बागवे यांनी अपघातग्रस्तांच्या विचारपूस करत त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था केली. उपचारानंतर सहाही पर्यटक सुखरूप असून टेम्पो ट्रॅव्हल चालक विजयकुमार झापडे याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचाराकरिता गोवा-बांबोळी येथे हलवण्यात आले. सामाजिक बांधिलकी तसेच मळगाव येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल गुजरात येथील मालविय परिवाराकडून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
अपघातात ट्रॅव्हलचालक याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.