

सावंतवाडी : साटेली तर्फ सातार्डा येथील डेक्कन मिनरल कंपनीला लोहखनिज उत्खनन आणि वाहतूक तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. खाणीत चुकीच्या पद्धतीने व परवान्यापेक्षा जास्त क्षेत्रात उत्खनन केल्याने तसेच खाण कोसळल्याने जनतेच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने जिल्हाधिकार्यांनी ही कारवाई केली.
जिल्हाधिकार्यांनी स्वतः याबाबत वस्तुस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी हे आदेश बजावले. दरम्यान, ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आणि पदाधिकार्यांच्या या मायनिंग विरोधात सुरू केलेल्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ठाकरे शिवसेना या मायनिंग प्रकल्पाविरोधात लढा देत होते. या प्रकल्पामुळे होणारी पर्यावरणाची हानी, प्रदूषण आणि स्थानिकांना होणारा त्रास याबाबत त्यांनी सातत्याने आवाज उठवला होता. खनिज उत्खनन करणारी कंपनी आणि त्यांचे राजकीय हस्तक शासन नियम आणि अटी धाब्यावर बसवून स्थानिक लोकांवर दादागिरी करत होते. या लँड माफियांनी शेतकर्यांच्या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्या होत्या. कंपनीने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक क्षेत्रात उत्खनन करून बागायती, घरे, नैसर्गिक पाण्याचे स्रोत आणि सुपीक जमिनी नष्ट केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला होता.
याची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी स्वतः या खाणपट्ट्याची पाहणी केली. या व्यवसायामुळे लोकांचे आरोग्य, निवास आणि शेतीचे नुकसान होत असल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर त्यांनी डेक्कन मिनरल कंपनीला उत्खनन आणि वाहतुकीस तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले. ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर, त्यांनी जिल्हा प्रशासनाला सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील इतर अनधिकृत मायनिंग प्रकल्पांची पाहणी करून तेही तात्काळ थांबवण्याची विनंती केली आहे.
मे. डेक्कन मिनरल्स कंपनीच्या लोहखनिज खाणपट्ट्यात बेकायदेशीर उत्खनन आणि चुकीच्या खाणकामामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने कंपनीला तातडीने खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत. केवळ 40.37 हेक्टर क्षेत्रावर उत्खननाची परवानगी असताना, कंपनीने त्यालगतच्या दोन्ही बंद खाणपट्ट्यांमध्येही बेकायदेशीर लोहखनिजाचे उत्खनन केल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय हे खाणकाम करताना सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. या चुकीच्या पद्धतीने झालेल्या खाणकामामुळे संबंधित तीनही खाणी कोसळल्या आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.