

सावंतवाडी : शहरासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या तब्बल ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचे काम गेल्या सात महिन्यांपासून बंद असल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी योजनेचे काम रखडणे योग्य नसून, येत्या आठ दिवसांत हे काम तातडीने सुरू न झाल्यास शिवसेनेच्या नगरसेवकांना घेऊन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना घेराव घालण्यात येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. पर्णकुटी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेला शिवसेना नगरसेवक देव्या सूर्याजी, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, अजय गोंदावळे, स्नेहा नाईक, तसेच बंटी राजपुरोहित आदी उपस्थित होते. सावंतवाडी शहरातील सुमारे ४० हजार नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता ही योजना वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे; मात्र गेल्या सात महिन्यांपासून योजनेचे काम पूर्णपणे ठप्प असल्याचे परब यांनी सांगितले. संबंधित ठेकेदाराची माणसे आणि कामगार उपलब्ध असतानाही त्यांना कोणत्या कारणामुळे काम करू दिले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकाराला मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी तातडीने या कामात लक्ष घालून सर्व अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी परब यांनी केली. नळपाणी योजनेचे थर्ड पार्टी ऑडिटदेखील पूर्ण झालेले असताना आता नेमकी कोणती तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचण शिल्लक आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
भविष्यात थर्ड पार्टी ऑडिटर सावंतवाडीत आलाच नाही तर नळ पाणी योजनेचे काम सुरू करणार नाही का असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला . दरम्यान आपणास कंत्राटदाराचे मुकादम भेटून गेले असून नळ पाणी योजनेच्या पाईपलाईनचे काम करण्यासाठी कामगार आलेले आहेत ते कामगार सध्या काम बंद असल्यामुळे बसून आहेत त्यांचेही नुकसान होत आहे. संपूर्ण सावंतवाडी शहराचे नुकसान होत आहे. नळ पाईप योजनेचे काम बंद करणे हे क्लेशदायक आहे हे काम बंद करण्याचे आदेश तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून दिले आहे असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला. सावंतवाडी आणि वेंगुर्ले या दोन्ही नगरपरिषदेसाठी १२ कोटी रु.निधी आ. केसरकर यांनी मंजूर करून दिला आहे याबद्दल त्यांनी आ. केसरकर यांचे अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक नगरपरिषदेला अडीज कोटी रुपयांचा निधी दिला आहे, यामध्ये विविध विकासकामे शहरात सुचवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मोती तलावा मधील गाळ उपसा करण्यासाठी अडीज कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून ही मागणी सुद्धा लवकरच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या विविध विकास कामांबद्दल उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व स्थानिक आ. दीपक केसरकर यांचे अभिनंदन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.