

मडुरा : रोणापाल येथील काजू बागायतीला गुरुवारी सकाळी सुमारे 11 वा. च्या सुमारास भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर काजू बागायतीत सुमारे सात वर्षांची कलमे असून यावर्षीपासून उत्पादन देणार होती. या आगीत दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या आगीमध्ये अमित गावडे, सहदेव गावडे आणि तानाजी गावडे यांच्या काजू बागायती जळून खाक झाल्या. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग विझवण्यासाठी अग्निशामन बंबाला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्या आधीच स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. बाबल परब, प्रदीप नाईक, संदेश केणी, सुदिन गावडे, मंगेश गावडे, बाबल तुयेकर व अशोक कुबल यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून आगीचा फैलाव रोखला. यावेळी रोणापाल पोलीस पाटील नीरजा परब यांनीही सहकार्य केले.
आग लागून झालेल्या नुकसानीची माहिती कृषी व महसूल विभागाला देण्यात आली असून, नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी केली आहे.