

कणकवली : कणकवली शहरात दहा दिवसांपूर्वी ज्वेलर्स दुकानात झालेल्या धाडसी चोरीतील आरोपी मोकाट असतानाच शुक्रवारी भरदिवसा सांगवे - संभाजीनगर येथील श्यामसुंदर विष्णू सावंत (55) यांच्या जेमतेम चार तासांसाठी बंद असलेल्या घरातील तब्बल 20 तोळे सोन्याचे दागिने व 40 हजारांच्या रोख रकमेवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला.
विशेष म्हणजे श्यामसुंदर सावंत यांच्या घराच्या कुलपाची चावी घराबाहेरीलच एका बॉक्समध्ये होती. चोरट्याने हीच संधी साधून या चावीच्या सहाय्याने कुलूप उघडून आत प्रवेश करून ही चोरी केली. ही चोरीची घटना शुक्रवारी दुपारी 2 वा. सुमारास उघडकीस आली.
कनेडी-कणकवली मार्गावर सांगवे-संभाजीनगर येथे रस्त्यालगतच शामसुंदर सावंत यांचे घर आहे. त्यांचे कुटुंबीय शुक्रवारी सकाळी 10 वा.च्या सुमारास एका कार्यक्रमासाठी गेले होते तर श्यामसुंदर यांचा टेम्पो असल्याने ते आपल्या व्यवसायासाठी घरातून निघून गेले होते. परिणामी, त्यांचे घर सकाळच्या सुमारास बंद होते. नेहमीप्रमाणे त्यांनी घराची चावी घराबाहेरील एका बॉक्समध्ये ठेवली होती. दुपारच्या सुमारास शामसुंदर व कुटुंबीय घरी दाखल झाले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने घराच्या बेडरूममधील कपाट कोणत्यातरी हत्याराने फोडले. याच कपाटामधील 20 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 40 हजारांची रोकड चोरट्याने लंपास केली. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव हे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले होते. श्वान पथकालाही पाचरण करण्यात आले. यावेळी सांगवे पोलीस पाटील दामोदर सावंत हे देखील उपस्थित होते. दरम्यान श्यामसुंदर सावंत यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
श्यामसुंदर सावंत यांचे घर अगदी रस्त्यालगत असून या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या घरात चोरी केली. विशेष म्हणजे घराबाहेरील ठेवलेल्या बॉक्समधून चावी काढून घराचे कुलूप उघडत चोरट्यांनी डाव साधला, याचा अर्थ चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचे स्पष्ट होत आहे. चोर्यांच्या घटनांमध्ये अलिकडच्या काही दिवसात वाढ झाली असून चोरटे मात्र मोकाट असल्याने पोलीस यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.