

कणकवली ः मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी येथून राजापूरकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराची चिरेवाहू ट्रक मिडल कटवरून टर्न घेत असताना ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार अमान अब्दुलगणी खतीब (22, रा. मधीलवाडी, राजापूर) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरठ तिठ्यानजीक उड्डाणपुलावर बुधवारी सकाळी 11.30 वा. च्या सुमारास घडला.
अमान हा कामानिमित्त राजापूर येथून दुचाकीवरून सावंतवाडी येथे गेला होता. सावंतवाडीतील काम आटपून तो पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. हुंबरठ तिठा दरम्यान महामार्गावरून सर्व्हिस रोडच्या दिशेने मिडलकटने जात असलेल्या चिरेवाहू ट्रकला दुचाकीस्वार अमान याची मागून धडक बसली. या धडकेत अमान याच्या डोक्याला व अन्य ठिकाणी गंभीर दुखापती झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी मदत कार्य करत अमान याचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अमान याच्या अपघाताची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय काही वेळानंतर उपजिल्हा रुग्णालय दाखल झाले. मात्र, अपघातात अमानचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर कुटुंबीयांच्या अश्रूचा बांध फुटला. अमानच्या गावातील मंडळी व त्याचे मित्र देखील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. अमान याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. राजापूरचे माजी नगरसेवक सलाम खतीब यांचा अमान हा पुतण्या होय.
या अपघात प्रकरणी कणकवली पोलिसांनी ट्रक चालक हरिश सर्जेराव पाटील (52, रा. राधानगर, कोल्हापूर) याच्या विरुद्ध त्याने आपल्या ताब्यातील ट्रक हुंबरठ येथील उड्डाणपुलावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवरून हयगयीने, अविचाराने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून फोंडाघाटकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडकडे ट्रक वळवल्याने त्याच्या ट्रकच्या पाठीमागील बाजूस अमान याची मोटारसायकल धडकून अपघात झाला, यामध्ये अमान याच्या दुखापतीस आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक हरिश पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.