Sindhudurg News : कर्ली नदीतील वाळू उपशाला महसूलचा दणका; ३३ अनधिकृत रॅम्प जमीनदोस्त

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : कुडाळ महसूल विभागाची कारवाई
Sindhudurg News
कर्ली नदीतील अवैध वाळू उपशाला महसूलचा दणका
Published on: 
Updated on: 

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने रविवारी (दि.२९) धडक कारवाई केली. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कुडाळच्या पथकाने कर्ली नदीकिनारी असलेल्या चेंदवण, कवठी, वालावल, नेरूरपार, नाईकनगर व सोनवडे परिसरातील सुमारे ३३ अनधिकृत वाळू रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केल्याची माहिती कुडाळ महसूल विभागाकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कर्ली नदीतील वाळू गटांच्या लिलाव प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असल्याने नदीपात्रातील वाळू उत्खननास बंदी आहे. असे असतानाही काही ठिकाणी बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच अवैध वाळू वाहतुकीसाठी नदीकिनारी विविध ठिकाणी अनधिकृत रॅम्प तयार करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ही विशेष मोहीम हाती घेतली.

या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर, ग्राम महसूल अधिकारी श्री. नेरकर, सागरे, केसरकर तसेच संबंधित गावांचे पोलीस पाटील यांच्या पथकाने सहभाग घेतला. पथकाने विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत रॅम्प निष्कासित केले. या कारवाईत चेंदवण – ४ रॅम्प, वालावल – ७ रॅम्प, सोनवडे – ९ रॅम्प व नेरूरपार – १३ रॅम्प असे एकूण – ३३ अनधिकृत वाळू रॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले.

कर्ली नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन, साठवणूक व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने कठोर भूमिका घेतली असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध यापुढेही सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. नैसर्गिक नदीसंपत्तीचे संरक्षण आणि शासनाच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी महसूल विभाग सज्ज असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईने अवैध वाळू व्यवसाय करणा-या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.