Eurasian Scops Owl : सिंधुदुर्गात दुर्मीळ ‘युरेशियन स्कॉप्स घुबडा’ची प्रथमच नोंद

मुंबईनंतर कोकणात पहिल्यांदाच अधिकृत दर्शन; वन्यजीवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
Eurasian Scops Owl
सिंधुदुर्गात दुर्मीळ ‘युरेशियन स्कॉप्स घुबडा’ची प्रथमच नोंद
Published on: 
Updated on: 

निर्णय राऊत

आंबोली : जैवविविधतेने परिपूर्ण आंबोलीचे महत्त्व दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. दोन दिवसांपूर्वीच सह्याद्रीतील अत्यंत दुर्मीळ आणि स्थलांतरित पाहुणा युरेशियन स्कॉप्स घुबडाची अधिकृत नोंद प्रथमच आंबोलीत झाली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात सुमारे १०० वर्षांनंतर २०१५ मध्ये याची मुंबईत एक नोंद झाली होती. त्यानंतर २१ नोव्हेंबरला युरेशियन स्कॉप्स घुबड हे आंबोलीत आढळून आल्याने देशभरातील निसर्ग व वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासकांत आनंदाचे वातावरण आहे. ही अत्यंत दुर्मीळ अशी नोंद निसर्ग अभ्यासक कौस्तुभ कोरगांवकर, केदार जाधव व पार्थ भिसे यांनी केली आहे.

'युरेशियन स्कॉप्स घुबड' हे प्रामुख्याने युरोप आणि मध्य आशियातून आफ्रिकेकडे स्थलांतर करते; परंतु स्थलांतराच्या काळात (विशेषतः ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान) चुकून किंवा मार्ग बदलल्यामुळे सह्याद्रीच्या रांगा आणि कोकण किनारपट्टीवर त्याचे अत्यंत दुर्मीळ दर्शन होते. याचे मुख्य वैशिष्ट्ये आणि ओळख म्हणजेच हे घुबड आकाराने खूप लहान (सुमारे १९ ते २१ सेंमी) असते. रंग राखाडी-तपकिरी असून अंगावर झाडाच्या सालीसारख्या सूक्ष्म रेषा असतात, ज्यामुळे फांदीवर बसल्यावर सहज ओळखू येत नाही. डोळे चमकदार पिवळ्या (सोनेरी) रंगाचे असतात आणि डोक्यावर पिसांचे छोटे तुरेे असतात. हे निशाचर घुबड असून रात्रीच्या वेळी एखाद्या शिट्टीसारखा किंवा बेडकासारखा एकसुरी आवाज ('क्यूटी' किंवा 'प्यू') काढते.

मुख्यतः कीटक, नाकतोडे, छोटे सरडे आणि छोटे उंदीर हे याचे खाद्य आहे. युरेशियन स्कॉप्स घुबडं मोकळ्या जंगलात, उद्यानांमध्ये आणि बागांमध्ये प्रजनन करतात. घरटे झाडाच्या किंवा भिंतीच्या छिद्रात असते. एका वेळेस सहसा ४ किंवा ५ अंडी असतात. अंडी फक्त मादीच उबवते. २४-२५ दिवसांनंतर पिल्ले बाहेर येतात. पिल्लांची काळजी दोन्ही पालक घेतात आणि त्यांना खाऊ घालतात. २१-२९ दिवसांची झाल्यावर ती उडण्यास शिकतात आणि ३०-४० दिवसांची झाल्यावर पालकांपासून स्वतंत्र होतात.

दरम्यान, आंबोलीच्या जंगलात प्रत्येक ऋतूत दुर्मीळ ते अतिदुर्मीळ किंवा नव्या प्रजातींच्या वनस्पती, जलचर, उभयचरसारख्या वन्यजीवांचे दर्शन होतं. त्यामुळे नेहमीच जगभरातील निसर्ग व वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासकांत आंबोलीबाबत आकर्षण व उत्सुकता असते. २१ नोव्हेंबरला आंबोलीच्या जंगलात नेहमीप्रमाणे भ्रमंती करणाऱ्या निसर्ग अभ्यासक कौस्तुभ कोरगांवकर, केदार जाधव व पार्थ भिसे यांना प्रथमच युरेशियन स्कॉप्स घुबडाचे अत्यंत दुर्मीळ दर्शन झाले आणि थेट छायाचित्रित त्याची नोंद झाली आहे.

मात्र, याच युरेशियन स्कॉप्स घुबडाशी काहीसे साम्य असलेलं ओरिएंटल स्कॉप्स घुबड आणि हिवाळी पाहुणे पॅलिड स्कॉप्स घुबड हे दिसायला युरेशियन स्कॉप्स घुबडासारखेच असतात. त्यामुळे अनेकदा याही प्रजातींना चुकून युरेशियन स्कॉप्स घुबड समजले जाते. त्यामुळे कौस्तुभ कोरगांवकर, केदार जाधव व पार्थ भिसे यांनी या अत्यंत दुर्मीळ आणि थेट छायाचित्रित नोंद केल्याने युरेशियन स्कॉप्स घुबडाबाबत पूर्ण खात्रीशीर संशोधन केले अन् ‘युरेशियन स्कॉप्स घुबड'ची मुंबईनंतर प्रथमच कोकणातील सिंधुदुर्गामधून आंबोलीत अधिकृत नोंद केली. आंबोली परिसरात आजपर्यंत स्थलांतरित व स्थानिक अशा एकूण १२ हून अधिक प्रजातींची घुबडे आढळून येतात, हे विशेष!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.