Sindhudurg News| ‘ऑनलाईन’ कामांच्या भडिमाराविरोधात शिक्षक समिती आक्रमक!

गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे यांची भेट; शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा
Sindhudurg News
मालवण : गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे यांच्या भेटीप्रसंगी शिक्षकांनी विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. (छाया : उदय बापर्डेकर)
Published on: 
Updated on: 

मालवण : राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका शाखा मालवणच्या वतीने गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे यांची सोमवार ५ ऑक्टोबर रोजी भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.

शिक्षकांना विविध ऑनलाईन कामांसाठी स्वतःचा मोबाईल, सिमकार्ड आणि इंटरनेट डेटा वापरण्यास भाग पाडले जाऊ नये, अशी भूमिका शिक्षक समितीने मांडली. तसेच कार्यालयीन वेळेनंतरही विविध ॲप्स, लिंक व ऑनलाइन माध्यमातून माहिती भरण्याची सक्ती केली जात असल्याने शिक्षकांच्या Right to Privacy, मानसिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक जीवनावर होणाऱ्या परिणामांकडे गटशिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले.

शिक्षकांचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे हा आहे. मात्र वाढत्या ऑनलाइन व अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचा मौल्यवान वेळ अशैक्षणिक कामांमध्ये खर्च होत असून, त्याचा परिणाम अध्यापन प्रक्रियेवर होत असल्याची बाब समितीने निदर्शनास आणून दिली.

शाळेच्या वेळेत मोबाईल बंदीचा इशारा

शिक्षक समितीने यापुढील भूमिकेबाबतही स्पष्ट संकेत दिले आहेत. योग्य निर्णय न झाल्यास शाळेच्या वेळेत शिक्षकांकडून मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद ठेवण्याची भूमिका घेण्यात येईल, असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. याबाबत पूर्वसूचना देण्यात आलेली असतानाही वरिष्ठ स्तरावरून शैक्षणिक व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज अथवा ऑनलाईन कामे पाठवल्यास समितीमार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे यांनी सकारात्मक भूमिका घेत कामाचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आश्वासन दिले. तसेच शिक्षक समितीने सादर केलेले निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “आपण मांडलेल्या मतांशी मीही सहमत आहे,” अशी सकारात्मक भावना त्यांनी व्यक्त केली. या भेटीमुळे शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आगामी काळात सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तालुका अध्यक्ष राजन जोशी, तालुका सचिव नंदकिशोर पाडगांवकर, शिक्षक नेते मंगेश कांबळी, माजी संचालक राजेंद्रप्रसाद गाड, विनोद कदम, महिला आघाडी अध्यक्ष नेहा तांबे, निशिगंधा वझे, उदय कदम, सुशन ढवण, संदीप नेवाळकर, मधुचंदा वस्त, रॉड्रिग्ज आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news