

कुडाळ : कोकणवासीयांचा महाउत्सव असलेल्या श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात या उत्सवाचे वेध सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील बाजारपेठांमधून श्री गणेशाच्या आरासासाठी लागणारे सजावटीचे साहित्य तसेच पूजा साहित्य, नैवेद्य, फराळाचे साहित्य दाखल झाले असून, या साहित्याच्या झळाळीने दुकाने झगमगू लागली आहेत. तर घराघरांत साफसफाई, रंगरंगोटी आदी काम सुरू झाली आहेत. गणेशमूर्ती शाळांमध्ये बाप्पाच्या मूर्तींना रंगरूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, बाजारपेठेत पूजा साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंची रेलचेल पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सव सजावट साहित्यामध्ये या वर्षी चांगलीच विविधता दिसून येत आहे. आकर्षक पडदे, छत, विविध प्रकारच्या झालरी, लाईट झुंबर, आर्टिफिशियल फुले, हार, माळा, व्हिस्टेरिया, चना मॅट, गणपतीसाठी शेले, एलईडी झालरी, पताके, इलेक्ट्रॉनिक तोरणे, रंगीत लाईटस्, बल्ब आदी साहित्य उपलब्ध झाले आहे. वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि आकर्षक डिझाईनमध्ये उपलब्ध या साहित्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीनुसार तसेच बजेटनुसार सजावट करण्याचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. सजावटीसोबतच धूप, कापूर, अगरबत्ती यासह विविध प्रकारचे पूजा साहित्यही बाजारात दाखल झाले आहे. या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत गर्दी करत आहेत. यंदाही गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी रेल्वे आणि एसटी प्रशासनाकडून जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्गवासीय सज्ज होत असून, जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे.
गणेशमूर्तींचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले
यंदा जीवनावश्यक वस्तूंसह गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांच्या किमतीत वाढ झाल्याने उत्सवावर महागाईचे सावट आहे. रंग व माती दरात वाढ झाल्याने गणेशमूर्तींचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत.
भजन मंडळांचा सराव रंगात
गणेशोत्सव म्हटला की, आरती आणि भजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाप्पासमोर पारंपरिक भजने सादर करण्यासाठी सध्या वाडीवाडीत भजनी मंडळांचा सराव सुरू झाला आहे. अनेक भजनी बुवांनी नवीन चालींवर गाणी बसवली असून, त्याचा जोरदार सराव सुरू आहे. भजनासाठी महत्त्वाची असलेली हार्मोनियम, मृदंग यांसह विविध वाद्यांच्या दुरुस्तीची कामेही जोरात सुरू आहेत.