सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

मसुरे; संतोष अपराज : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री  भराडी देवीची जत्रा अवघ्या चार पाच  दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी सदर जत्रोत्सव शनिवार दिनांक २ मार्च रोजी होत आहे. यादिवशी पहाटे ३ वाजल्या पासून एकूण ९ दर्शन रांगाद्वारे भाविकांना आई भराडी मातेचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसरात यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ आणि शासकीय प्रशासकीय यंत्रणांकडून जत्रा सुरळीत पार पडण्यासाठी काम चालू आहे. व्यापारी बांधवांनी दुकाने थाटण्यास प्रारंभ केला असून विविध व्यावसाईकांची आंगणेवाडी मध्ये लगबग वाढल्याचे दिसून येत आहे.

जसजशी दुकाने सजायला लागली, तसतसा आंगणेवाडी परिसर फुलून जात आहे. जत्रोत्सवापूर्वीच आंगणेवाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.  सामाजिक संस्था व विविध पक्षांकडूनही विविध सामाजिक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई व फुलांची आरास लक्षवेधी ठरणार आहे. आंगणेवाडी जत्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भाविकांना देवीचे दर्शन घेण्याबरोबरच अनेक प्रकारच्या सुविधा  उपलब्ध झाल्या आहेत. सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.   सरबत वाटपाच्या कार्यक्रमापासून ते आरोग्य तपासणीपर्यंतचे अनेक सेवाभावी उपक्रम यात्रेत राबविले जातात.  यावर्षी भाविक गर्दीचा उच्चांक  होणार असल्याने  भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना त्रुटी दूर केल्या जात आहेत. दर्शन रांग लाकडी पूल आणि इतर रांग व्यवस्था काम अंतिम टप्यात आले आहे.

व्हीआयपी मार्ग अशी ओळख असलेला मसुरे आंगणेवाडी मार्गावरील दत्त घाटी मध्ये स्ट्रीट लाइट व्यवस्था चोख आहे. त्यामुळे सदर मार्ग अधिक सुरक्षित होणार आहे. देवालयालगत असलेले दोन ट्रान्सफॉर्मर शाळेच्या मागे एकाच ठिकाणी केल्याने  यामुळे सदर परिसर अधिक सुरक्षित होणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे पोहोचणारे रस्ते दर्जा उन्नती करून  प्राधान्याने पूर्ण केल्याने भाविक आभार मानत आहेत. जत्रेदिवशी रात्री व्हीआयपी मार्गावरील मसुरे देऊळवाडा दत्त घाटी येथे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी जादा वाहतूक पोलीस याठिकाणी तैनात करणे आवश्यक आहे.

जादा रेल्वे सोडण्याची मागणी

आंगणेवाडी जत्रोत्सवास मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी कोकणात येतात. या चाकरमान्यांना जिल्ह्यात येण्यासाठी रेल्वेचा प्रवास अधिक सोईस्कर आहे. २ मार्च पूर्वी सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. काही गाड्यांचे वेटिंग तिकीट सुद्धा उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याची मागणी चाकरमान्यांमधून होत आहे. एकूणच जत्रा पूर्व तयारीने बऱ्यापैकी वेग घेतला असून आंगणे ग्रामस्थ लाखो भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होत असल्याचे चित्र आंगणेवाडीत दिसून येत आहे.

यात्रा कालावधीत यात्रा स्थळातील कणकवली आणि मालवण स्टँडकडून  मंदिरा पर्यंत अपंगांसाठी जाण्याची सोय यावर्षी प्रथमच रिक्षाद्वारे करण्यात येणार आहे.  असे मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी स्पष्ट केले आहे.

पाण्याच्या टाक्या दुरुस्ती आणि नव्याने उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, इंटरनेट, बस सेवा, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा मुबलक आणि सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकऱ्यांमार्फत संबंधित कर्मचाऱ्यांनान योग्य सुचाना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील पहिलेच सुसज्ज असे सुलभ प्रसाधनगृह पालक मंत्री मा. रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांतून पुर्ण झाले आहे.. याचा लाभ भाविकांना होणार आहे.

कोकण रेल्वे यावर्षी दिनांक १ मार्च रोजी कुर्ला रेल्वे स्टेशन ते मडगाव रेल्वे स्टेशन पुन्हा ३ मार्च रोजी रिटर्न अशी आंगणेवाडी यात्रा स्पेशल जादा रेल्वे सोडण्यात येणार आहे. याची तिकिट बुकिंग सुरु आहे. त्याचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिकोत्सव हा उत्सव  २ व ३ मार्च असा दोन दिवस साजरा होणार आहे. जेणेकरून दुसऱ्या दिवशीही आंगणेवाडीत येणाऱ्या सर्वाना देवीचे दर्शन सुलभतेने घेता येणार आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ मार्च रोजी भाविकांना कमी गर्दीमध्ये मातेचे दर्शन सुलभरीत्या होण्यास मदत होणार आहे. श्रीदेवी भराडी मातेच्या भक्तांनी यात्रा काळात रांगांचाच लाभ  अवश्य घ्यावा असे आवाहन आंगणे कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news