

कणकवली : जिल्हा परिषद बांधकाम विभागात बिलांवर खोट्या सह्या केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परत सही करताना हात कापतील एवढी काळजी मी घेणार आहे. नितेश राणे पालकमंत्री आहेत हे काही लोकांनी विसरू नये. अशा पध्दतीचा भ्रष्टाचार कुणी आमच्या जिल्हा परिषदेमध्ये करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. जनतेला विश्वास देवून जि.प.ची सत्ता आम्ही मागतो. असे जे काही अधिकारी आहेत, ज्यांनी ही हिंमत केली आहे. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चौकशीमध्ये काही धक्कादायक नावे पुढे येत आहेत. अधिकारी आणि कॉन्ट्रक्टर स्वत:चे डोके लावत नाहीत. काही लोक आहेत जे त्यांचे गॉडफादर आहेत. त्यांचीही नावे माझ्याकडे आली आहेत. टप्प्याटप्प्याने तुम्ही बघा, वर्षभरात तुम्हाला बातम्या मिळतील, एवढी काळजी घेऊ, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा परिषद बांधकाम विभागात बिलांवर कार्यकारी अभियंत्यांच्या खोट्या सह्या करून बिले काढल्याचा प्रकार काही दिवसापूर्वी उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले असता मंत्री राणे यांनी संबंधितांना इशारा दिला. त्यामुळे पुढील काळात याप्रकरणी कुणावर कारवाई होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत पालकमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, इंदापूरचा उड्डाणपूल आणि एक दोन पॅच राहिले आहेत, बाकी सर्व काम पूर्ण झाले आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल आणि येत्या गणपतीला कमीत कमी वेळात चाकरमानी गावी पोहोचतील, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, लव्ह जिहादला प्रोत्साहन देणाऱ्यांची पाळेमुळे उखडण्यासाठीच आमच्यासारख्यांना मंत्रीपदी बसविले आहे. जे याला प्रोत्साहन देतात, पैसे पुरवतात त्यांच्यावर आमची करडी नजर आहे. जेव्हा जेव्हा अटक होण्याच्या बातम्या येतील तेव्हा ही व्यक्ती लव्ह जिहादला प्रोत्साहन देत होती हे समजेल. सिंधुदुर्ग असेल किंवा महाराष्ट्र, हा देवाभाऊंचा महाराष्ट्र आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली आमच्या हिंदू मुली, माताभगिनींचे भविष्य खराब करण्याची कुणीही हिंमत करू शकणार नाही. आता धर्म स्वातंत्र्य कायदा आपल्या राज्यात लागू झाला आहे. कुणी लव्ह जिहादची हिंमत केली तर थेट सात वर्षाची नॉनबेलेबल शिक्षा आहे, त्यांना जेलची हवा खावी लागेल असा इशारा मंत्री राणे यांनी दिला.
मत्स्योद्योग खात्याचा मंत्री म्हणून आपण गेल्या दीड वर्षात अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. मच्छीमारांना कृषी व्यवसायाचा दर्जा दिला. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना आणली. पुढील चार वर्षात या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार आहे. मच्छीमार सक्षम झाला तर आपला कोकण, राज्य सक्षम होणार आहे. आंध्रप्रदेश राज्याचे ६० टक्के बजेट हे मत्स्योद्योगावर आहे. लवकरच आपण आंध्र प्रदेशचा दौरा करून तेथील मत्स्योद्योग धोरणांची माहिती घेवून आपल्या राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.