

कुडाळ : कुडाळ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी सोमवारी महायुतीकडून अंतिम निर्णय जाहीर झाला. शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक सभापती पदासाठी तर भाजपचे सिताराम तेली उपसभापती पदासाठी बिनविरोध निवडले गेले. ठाकरे शिवसेनेने या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला आणि निवडणूक ही फक्त औपचारिकता ठरली. सभापती, उपसभापती यांच्यावर पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
कुडाळ पंचायत समितीच्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले सभागृहात निवडणूक निर्णय अमरसिंह जाधव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. गटविकास अधिकारी प्रफुल वालावलकर उपस्थित होते. कुडाळ पंचायत समितीत महायुतीचा पूर्ण वर्चस्व आहे. येथे भाजपाचे 7, शिंदे शिवसेनेचे 6 तर विरोधी ठाकरे शिवसेनेचे 5 सदस्य आहेत. सभापतीपदासाठी भाजपापेक्षा एक सदस्य कमी असूनही शिंदे शिवसेनेला विजय मिळाला. यामुळे कुडाळ तालुक्यात आ. निलेश राणे यांचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले असून, राजकीय वर्तुळात आ. राणे यांना निर्णायक फॅक्टर ठरल्याची चर्चा रंगली आहे.
सोमवारी अर्ज दाखल करताना शिंदे शिवसेनेचे नेते, जि. प. माजी अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, जि.प. सदस्या दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, रूपेश कानडे, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, बाळकृष्ण मडव, निखिल कांदळगावकर आणि महायुतीचे सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेच्या दिवशी पंचायत समितीचे मुख्य गेट फुगे लावून सजविण्यात आले होते. सभागृहाच्या दालनासमोर रंगोळी काढण्यात आली होती, तर सर्व नवनिर्वाचित सदस्य भगवा फेटा बांधून उत्साहात उपस्थित होते. दुपारी 3 वा. पासून नामनिर्देशन पत्रांची छाननी, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आणि निवडणूक पार पडली; परंतु दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज असल्याने बिनविरोध निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अमरसिंह जाधव यांनी सभापतीपदी मिलिंद नाईक आणि उपसभापतीपदी सिताराम तेली यांची नावे जाहीर केली.
प्रशासकीय राजवटीनंतर लोकशाहीची पहाट
सन 2022 मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झालेल्या शेवटच्या सभेनंतर पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट लागू झाली होती. तब्बल चार वर्षे दोन महिने लोकप्रतिनिधी नसल्याने निर्णयप्रक्रियेत लोकशाहीचा अभाव जाणवत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत होती. आता नवनिर्वाचित सभापती मिलिंद नाईक याच्या नेतृत्वाखाली पहिली सभा होणार असून, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल.