

कणकवली : कणकवली व कुडाळ परिसरात जबरीने गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरी करणाऱ्या टोळीतील एका सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अमरावती जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले. रोहन मोहन हुनकर (वय 23, रा. येरला, ता. मोर्शी, जि. अमरावती) असे या आरोपीचे नाव आहे.
त्याच्यावर कणकवली तसेच कुडाळ पोलिस ठाणे येथे गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तसेच मानवी कौशल्य व तांत्रिक तपासाच्या आधारे ११ मे २०२६ रोजी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात सापळा रचत संशयित रोहन हुनकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांसह मोटारसायकलवर येऊन सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. रोहन हुनकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध वर्धा, अकोला आणि अमरावती येथे सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच कोल्हापूर, सांगली आणि अमरावती येथेही तो वॉन्टेड आरोपी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पुढील तपासासाठी त्याला कणकवली पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक मोहन दहिकर व अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार संबंधित पथकाने ही कारवाई केली.