Sindhudurg News : पिंगुळी-गणेशकोंडमध्ये मगरीचा थरार

भलीमोठी मगर अखेर २४ तासांनी जेरबंद
Sindhudurg News
पिंगुळी-गणेशकोंडमध्ये मगरीचा थरार
Published on
Updated on

कुडाळ : पिंगुळी-भूपकरवाडी येथील गणेशकोंडीतील सुमारे सहा ते सात फुटी मगर वन विभागाच्या बचाव पथकाने मंगळवारी दुपारी शिताफीने जेरबंद केली. सोमवारी दुपारपासून सुरू असलेल्या अथक बचाव मोहिमेला सुमारे २४ तासांनी मंगळवारी दुपारी यश आले. पकडलेली मगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. मगरीच्या दर्शनाने परिसरात खळबळ उडाली होती.

भूपकरवाडी येथील कृष्णा विश्वास चव्हाण या मुलाला सोमवारी दुपारी गणेशकोंडच्या पाण्यात मगर दिसून आली. त्याने ग्रामस्थांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच गोंधळपूरचे पोलिस पाटील शंकर सातार्डेकर यांनी घटनास्थळी जात संबंधित यंत्रणांना माहिती दिली. त्यानंतर सरपंच अजय आकेरकर, ग्रा. पं. सदस्य आयाज खुल्ली व मंगेश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. सरपंचांनी तातडीने संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून रेस्क्यू ऑपरेशनसाठी आवश्यक व्यवस्था केली. त्यानंतर वन विभाग जलद कृती दल, एमआयडीसी अग्निशमन दल, कुडाळ नगरपंचायत अग्निशमन दल तसेच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले.

पाणी उपसा करूनही मगर हाती नाही

मगर पकडण्यासाठी गणेशकोंडमधील पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली. पाणी उपसा केल्यानंतर पाण्याची पातळी काही कमी झाली आणि मगर स्पष्टपणे दिसून आली. मात्र, चिखल आणि त्यातच अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने तसेच तेथील ओहळातील बंधारा फुटल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी गणेशकोंडमध्ये शिरले. त्यामुळे बचाव पथकाच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला. अखेर मगर गणेशकोंडच्या बाहेर जाऊ नये यासाठी रेस्क्यू टीमने परिसराला जाळी लावून सुरक्षित केले. रात्री ११ वा. बचावकार्य थांबविण्यात आले.

मंगळवार सकाळपासून पुन्हा मोहीम

मंगळवारी स.९ वा.पासून पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यात आले. इंजिनाच्या सहाय्याने गणेशकोंडमधील पाणी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या जलद बचाव पथकाने जाळीच्या सहाय्याने मगरीला एकदा जाळ्यात सापडली; मात्र ती जाळ्यातून निसटली त्यानंतरही पथकाने प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर मंगळवारी दुपारी १ वा. च्या सुमारास वन विभागाच्या जलद कृती दलाने मगरीला यशस्वी जेरबंद केले. या बचाव मोहिमेत कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनपाल सूर्यकांत सावंत, वनरक्षक समीर खरावत (नेरूर), वनरक्षक सागर भोजणे (मठ), जलद बचाव पथकाचे अनिल गावडे, वैभव अमृसकर, प्रसाद गावडे, सुशांत करंगुटकर, राहुल मयेकर व दिवाकर बांबर्डेकर यांनी सहभाग घेतला. मगरीची वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news