Sindhudurg Accident : मातीच्या ढिगाऱ्यावर कार आदळून फोंडाघाट येथील तरुणाचा मृत्‍यू

कणकवली-फोंडा मार्गावर डामरे येथील दुर्घटना
Sindhudurg Accident News
मातीच्या ढिगाऱ्यावर कार आदळून फोंडाघाट येथील तरुणाचा मृत्‍यू
Published on
Updated on

कणकवली : कणकवली ते फोंडाघाट जाणारी भरधाव कार रस्‍त्‍याच्या विरुद्ध दिशेला मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून अपघात झाला. या अपघातात कारखाली सापडून कारचालक मैत्रेय ऊर्फ गोट्या राजेश पेडणेकर (वय २८, रा. फोंडाघाट, बाजारपेठ) याचा मृत्‍यू झाला. ही घटना बुधवारी रात्री ९.३० ते ९.४५ वा. च्या सुमारास घडली.

सिव्हिल इंजिनिअर असलेला मैत्रेय हा कारने बुधवारी रात्री कणकवलीवरून फोंडाघाटच्या दिशेने निघाला होता. डामरे - कानडेवाडी स्‍टॉपनजीक त्‍याचा कारवरील ताबा सुटला आणि भरधाव कार रस्‍त्‍याच्या विरुद्ध दिशेला मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. याबाबत रात्री ९.४५ वा. डामरे येथील दर्शन सावंत यांनी फोंडाघाट येथील विजय हळदिवे यांना मोबाईलवर कॉल करून कानडेवाडी स्‍टॉपजवळ कारला अपघात झाल्‍याचे सांगितले. त्‍यानंतर विजय हळदिवे हे त्‍यांचे मित्र सिद्धेश पावसकर याच्यासमवेत अपघातस्‍थळी पोहोचले. त्‍यावेळी कार मातीच्या ढिगाऱ्याला आदळून अपघात झाल्‍याचे दिसून आले. गाडीचा चालक गाडीखाली अडकलेला दिसला. त्‍यांनी ११२ नंबर वर फोन करून कळवले. त्‍यानंतर पोलिस आणि जमलेल्‍या ग्रामस्‍थांच्या मदतीने त्‍याला बाहेर काढून रुग्‍णवाहिकेतून उपजिल्‍हा रुग्‍णालय कणकवली येथे नेले असता रात्री ११.४० वा. च्या सुमारास तो मृत असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

याबाबतची खबर विजय गोविंद हळदिवे (रा. फोंडाघाट) यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कमलेश बच्चाव, उपनिरीक्षक प्रीतेश पाटील, हवालदार विनोद चव्हाण व अन्य पोलिस कर्मचारी दाखल झाले. घटनास्‍थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. मैत्रेय हा कणकवली, ओरोस याठिकाणी बांधकामाची कामे घेत असे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news