

कणकवली/फोंडाघाट : फोंडाघाट-फोंडेकरवाडी येथील सूर्यकांत विठ्ठल फोंडेकर (५२) यांच्यावर दारूच्या नशेत लोखंडी रॉडने डोक्यात जोरदार हल्ला केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवार २७ सप्टेंबर रोजी रात्री ७.४५ वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित विष्णू यशवंत तळेकर (रा. गडगेसखल-तळेकरवाडी) याच्यावर पोलिसांनी ॲट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. विशेष म्हणजे सूर्यकांत फोंडेकर हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना संशयित विष्णू तळेकर हा त्याच्यालगतच एका चटईवर झोपला होता.
सूर्यकांत फोंडेकर आणि विष्णू तळेकर हे दोघे अधूनमधून फोंडाघाट परिसरात भेटत असत. रविवारी सायंकाळी सुमारे ७.४५ वा. च्या सुमारास सूर्यकांत फोंडेकर यांचा पुतण्या भिकाजी विजय फोंडेकर हे दुसऱ्या दिवशी कामानिमित्त कोल्हापूरला जायचे असल्याने आपलेे काका सूर्यकांत फोंडेकर यांच्या घरी गेले. त्यावेळी सूर्यकांत फोंडेकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्यांच्या बाजूला विष्णू तळेकर हा झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. भिकाजी यांनी सूर्यकांत यांना काय झाले, अशी विचारणा विष्णू तळेकर याच्याकडे केली असता, ‘सूर्यकांत यांनी शिवीगाळ केली म्हणून आपण त्यांना मारले,’ असे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घरात पडला होता रक्ताचा सडा
सूर्यकांत फोंडेकर आणि विष्णू तळेकर हे दारू पिण्यासाठी एकत्र बसत. त्याच दरम्यान त्यांच्यात वाद होऊन विष्णू तळेकर याने सूर्यकांत यांच्या डोक्यावर रॉडने हल्ला केला आणि अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात ते पडले. घरात रक्ताचा सडा पडला होता. बाजूलाच हल्ला करणारा विष्णू तळेकर हा चटईवर झोपला होता. त्याचेही हात रक्ताने माखले होते.