

सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोल प्लाझा सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने निविदा मागविल्या आहेत. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच जिल्ह्यातील विरोधकांनी टोल विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गाचे काम पूर्ण नसताना टोलनाका सुरू करणे हे अन्यायकारक आहे. या टोलनाक्याचा सर्वाधिक भुर्दंड सिंधुदुर्गवासीयांनाच सोसावा लागणार आहे, असे सांगत विरोधी ठाकरे शिवसेना, मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रसंगी महामार्ग रोकोचा इशारा दिला आहे.
महामार्ग प्राधिकरणने ओसरगाव टोलनाका सुरू करण्यासाठी निविदा मागविल्याचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध झाले. तत्पूर्वी खा. नारायण राणे यांच्या वाढदिनानिमित्त सिंधुदुर्गात आलेले केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली. यावर टीका करताना ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक यांनी ना. गडकरी यांनी सिंधुदुर्गवासीयांना 'टोल भेट' दिल्याचा आरोप केला होता. लगतच्या गोवा राज्यात एकही टोलनाका नाही. कोल्हापूर जिल्ह्यातही टोल वसुली होत नाही. मग सिंधुदुर्गवासीयांवरच टोल सक्ती का, असा थेट सवाल करत नाईक यांनी टोल वसुली बंदीसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.
ठाकरे शिवसेनेचे माजी खा. विनायक राऊत यांनीही ओसरगाव टोलनाका सुरू करणे हा जिल्हावासीयांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करत याबाबत आपण केंद्रीयमंत्री व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच वेळप्रसंगी ठाकरे शिवसेना जनआंदोलन उभारेल, असा इशारा दिला.
तर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनीही याप्रश्नी आक्रमक भूमिका घेत दोन वर्षांपूर्वी जसे टोल विरोधी आंदोलन उभारले होते, त्याच आंदोलनाची पुनरावृत्ती करण्याचाइशारा दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर व अन्य पदाधिकाऱ्यांनीही टोल वसुली सिंधुदुर्गवासीयांवर अन्यायकारक असल्याचे सांगत या विरोधात मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या टोल वसुली विरोधात विरोधक आक्रमक झाले असले, तरी सत्ताधारी भाजप, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
वैभव नाईकांचा 'टोल' निविदेवर डोळा
ओसरगाव टोलनाका सुरू करण्यावरून ठाकरे सेनेचे माजी आ. वैभव नाईक यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेचे आ. नीलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. वैभव नाईक यांचा डोळा टोलबाबतच्या निविदेवर आहे. सुरुवातीला आंदोलनाची भाषा करायची, ठेकेदाराला धमकी द्यायची व नंतर सेटलमेंट करायची ही नाईक यांची जुनीच कार्यपद्धत आहे, अशा शब्दांत आ. राणे यांनी नाईक यांच्यावर निशाणा साधला.