

देवगड ः देवगड शहर प्रारुप विकास आराखड्यासंदर्भात जनतेला माहिती देण्यासाठी नगरपंचायतीने शुक्रवारी दुपारी इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित विशेष सभेत ग्रामस्थांनी प्रारुप विकास आराखड्याला पुन्हा विरोध दर्शवून तो रद्द करण्याची एकमुखी मागणी केली. नगररचना अधिकारी नाजनीन मोमीन, प्रभारी मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा तसेच आराखडा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर, ग्रामस्थांनी प्रारुप विकास आराखड्यावर हरकती नोंदविण्यासाठी एक महिन्याच्या वाढीव कालावधीची मागणी केली. यावर, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या सोमवारपर्यंत वाढीव कालावधीबाबतचा निर्णय दिला जाईल. तसेच जनतेला आराखडा समजून सांगण्यासाठी न. पं. कार्यालयात नगररचना विभागाकडून एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आश्वासन श्रीमती मोमीन यांनी दिले.
व्यासपीठावर नगररचना सहायक जीवन सरडे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला नगररचना अधिकारी श्रीमती मोमीन यांनी ग्रामस्थांना शहर प्रारुप विकास आराखड्याबाबत माहिती दिली. हा आराखडा अंतिम नसून ही पहिली पायरी आहे. हा आराखडा अद्याप मंजूर नाही. आराखड्यावर ग्रामस्थांनी हरकती, सूचना नगरपंचायत कार्यालयात नोंदवायच्या आहेत. या हरकतींवर तज्ज्ञ समितीच्यावतीने सुनावणी घेण्यात येईल. या समिती अहवालानंतर या आराखड्यात आवश्यक फेरबदल करण्यात येतील व नवीन आराखडा पुन्हा जनतेसमोर ठेवण्यात येईल, असे श्रीमती मोमीन यांनी सांगितले. प्रसाद मोंडकर म्हणाले, हा आराखडा सदोष असून आराखड्याचे फायदे व तोटे काय आहेत? आरक्षित जमीन जागांसाठी निकष कोणते आहेत? हे जनतेला समजून सांगावे. संजय बांदेकर यांनी आराखड्यासाठी कधी सर्व्हे करण्यात आला होता, अशी विचारणा केली. श्रीमती मोमीन म्हणाल्या, आराखड्याला केवळ विरोध करून उपयोग नाही. जनतेने हा आराखडा समजून घ्यावा. हा आराखडा आज रद्द झाला, तर तो पुढील काळात होणारच आहे. पुढील 20 वर्षांचा विचार करून हा आराखडा बनविण्यात आला असून वाढत्या शहरीकरणात शहराचे सौंदर्गीकरण टिकवून ठेवण्यासाठी हा आराखडा महत्वाचा आहे. आतापर्यंत न. पं. कार्यालयात 35 हरकती प्राप्त झाल्या असून येथे उपस्थित जनसमुदाय लक्षात घेता हरकतींची संख्या वाढली पाहिजे. हरकतींवर योग्य निर्णय तज्ज्ञ समितीमार्फत घेतले जातील. जमीन जागांवरील आरक्षणे म्हणजे शासनाचा मालकी हक्क नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आराखडा नीट समजून घ्यावा व आपल्या हरकती नोंद कराव्यात, असे आवाहन केले.
हा आराखडा जनतेला विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आला आहे. या आराखड्याबाबत जनजागृती करण्यात न. पं. प्रशासन फेल ठरले आहे. त्यामुळे हा आराखडा रद्द करावा, अशी मागणी शिवाजी कांदळगावकर यांनी केली. विजय कदम,रिमा आचरेकर, विलास रुमडे यांनीही आपले आक्षेप नोंदवले. ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेवक नगरसेविका, डॉ. सुनील आठवले, उमेश कुळकर्णी, चंदन मेस्त्री, निशिकांत साटम आदी उपस्थित होते. सभेला सुमारे 500 हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सभास्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.