Sindhudurg Omkar Elephant| ओटवणे गावात ओंकार हत्तीचा धुमाकूळ!

नॅनो कार, दुचाकीसह पाण्याच्या टाकीची केली तोडफोड
Omkar Elephant
Omkar ElephantPudhari
Published on: 
Updated on: 

सावंतवाडी: सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात मुक्त संचार करणारा ‘ओंकार’ हत्ती गेले काही दिवसांपासून कमालीचा आक्रमक बनला आहे. विशेष म्हणजे तो शेती, बागायतींचे नुकसान करण्याबरोबरच गाड्या व अन्य वस्तुंना लक्ष करून त्यांची तोडफोड करत असल्याने शेतकऱ्यांबरोबरच नागरिकही त्रस्त झाले आहेत. बुधवारी रात्र इन्सुली गावात दुचाकीचा चुराडा केल्या नंतर गुरूवारी रात्री ‘ओंकार’ने ओटवणे गावात एका घरासमसेर उभी नॅनो कार, दुचाकीची तोडफोड करत एक पाण्याची टाकीही फोडून टाकली.

या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गुरुवारी रात्री १० वा.च्या सुमारास ओंकार हत्ती ओटवणे येथील नागेश वरेकर यांच्या अंगणात दाखल झाला. अंगणात महाकाय हत्ती पाहून वरेकर कुटुंबियांची त्रेधा तिरपट उडाली. दरम्यान हत्तीने वरेकर यांच्या अंगणात उभी केलेली नॅनो कार व दुचाकीची तोडफोड केली.

त्यानंतर रात्री उशिरा त्याने शेजारील श्री. भगत यांच्या पाण्याच्या टाकीचीही तोडफोड करून नुकसान केले.धक्कादायक म्हणजे, हत्ती गावात शिरून धुमाकूळ घालत असताना वनविभागाला याची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. हत्तीच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असताना वनविभागाचे कर्मचारी हतबल झाल्याचे चित्र आहे. या प्रकारानंतर संतोष कटाळे आणि विनायक वरणेकर यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. या हत्तीला तात्काळ जंगलात हाकलून लावावे आणि वारंवार हत्ती लोकवस्तीत घुसून घरांचे नुकसान करत असताना ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.