Omkar Elephant| 'ओंकार' हत्तीचे वनविभागासमोर दुहेरी आव्हान!

जीवितहानी, नुकसान टाळण्याबरोबरच त्याच्या संरक्षणाचीही जबाबदारी
Omkar Elephant
'ओंकार' हत्तीचे वनविभागासमोर दुहेरी आव्हान!
Published on: 
Updated on: 

सिंधुदुर्ग : गेल्या दोन वर्षांपासून सावंतवाडी तालुक्यातील नेमळे, निरवडे, तळवडे, वेत्ये आदी भागात संचार करत असलेल्या 'ओंकार' हत्तीच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले आहेत. मानवी वस्तीतही त्याचा वावर वाढल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. शेती बागायती आणि मालमत्तेच्या नुकसानीमुळे त्रस्त ग्रामस्थ त्याच्या बंदोबस्ताची मागणी वारंवार करत आहेत. त्यामुळे वनविभागासमोर शेती बागायतीचे नुकसान टाळण्याबरोबरच कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये तसेच ओंकार आपल्या कळपात पुन्हा परतेपर्यंत त्याचे संरक्षण करण्याचे दुहेरी आव्हान आहे.

सिंधुदुर्गात सन २००२ पासून रानटी हत्तींचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या कळपातील ओंकार हत्ती दोन वर्षांपूर्वी सावंतवाडी तालुक्यात आला. आता तो १३-१४ वर्षांचा आहे. सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये ओंकारचा संचार सुरू आहे. अधूनमधून त्याचे मानवी वस्तीकडे येणे वाढले आहे. साहजिकच भातशेती, बागायती आणि मालमत्तांचे नुकसान त्याच्याकडून सुरू झाले. सुरूवातीला त्याला हुसकावण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र त्याला यश आले नाही. तो काही प्रमाणात माणसाळल्यासारखा झाला, परंतू त्याच्या जवळ जाण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो पाठलागही करतो. सध्या त्याचा वावर नेमळे, निरवडे, वेत्ये परिसरात आहे. त्याच्याकडून होत असलेल्या नुकसानीमुळे आणि त्याच्या वावरामुळे शेती बागायतीत जाणे धोक्याचे ठरत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.

भात, नाचणी, बांबू आदी तत्सम त्याचे खाद्य आहे. ओंकार हत्ती आता वयात आला असून तो स्वतःची हद्द तयार करू पाहत आहे. कळपापासून वेगळे राहून तो जोडीदाराच्या शोधात आहे, मात्र जोडीदार मिळत नसल्याने तो इकडेतिकडे फिरून सुरक्षित जागा शोधत आहे. ग्रामस्थांनी त्याला फटाके वाजवून डिवचू नये. त्याला न डिवचता शांतपणे योग्य दिशेने त्याच्या कळपात पाठवण्याचे प्रयत्न असल्याचे वनविभागाकडून सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.