Sindhudurg News : सिंधुदुर्गात 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा वाढणार

विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा 'यलो अलर्ट' ; आंबा-काजू बागायतदारांची चिंता वाढली
Heat Wave
Heat Wave Pudhari
Published on: 
Updated on: 

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिली असून, अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने 'ऑक्टोबर हिट'चे तीव्र सावट पसरले आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने जिल्ह्यात विजांचा लखलखाट, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाहणारा सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता वर्तवत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

​जिल्ह्यात १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या ते अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अचानक बदलणाऱ्या या हवामानाचा फटका शेती पिकांना बसू नये, यासाठी मुळदे येथील 'ग्रामीण कृषी मौसम सेवा' व कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

पुढील पाच दिवसांत कमाल तापमान ३४° से. तर किमान तापमान २४° से. राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेतील घटीमुळे हवामान अंशतः ढगाळ राहील. २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान अतिहलक्या स्वरूपाचा, तर ५ ऑक्टोबर रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच ६ ते १२ ऑक्टोबर या काळात दक्षिण कोकणात सरासरीपेक्षा कमी पावसाची आणि सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतात आणि मोकळ्या जागेत काम करणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.

पीकांची अशी घ्या काळजी

जिल्ह्यात गेले १५ दिवस पाऊस नसल्याने हळव्या भात पिकाला पाण्याचा ताण बसण्याची शक्यता आहे. दाणे भरण्याच्या टप्प्यात पाण्याचा ताण बसल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते.त्यामुळे भातातील बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) विद्राव्य खताची (१० ग्रॅम प्रति १ लिटर पाणी) फवारणी करावी. तसेच जिथे पाण्याची कमतरता आहे तेथे विहीर, नदी किंवा नाल्यांतून भात पिकाला पाणी द्यावे.पावसाची उघडीप व आर्द्रतेमुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भात खाचरांच्या बांधावरील तण काढून स्वच्छ ठेवावे आणि खाचरांमध्ये बेडकांचे संवर्धन करावे. कीडीचा प्रसार रोखण्यासाठी खाचराभोवती २ फूट खोल चर खोदावेत.प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास क्लोरॅंट्रानिलीप्रोल (४ मि.ली. प्रति १० लिटर) किंवा स्पिनेटोरॅम (५ मि.ली. प्रति १० लिटर) ची सकाळी किंवा सायंकाळी हवा शांत असताना फवारणी करावी.

तापमान वाढ व आर्द्रता घटल्यामुळे आंबा व काजू झाडांना अवेळी नवपालवी व अल्प प्रमाणात मोहोर येऊ शकतो. मात्र बागायतदारांनी अशा वेळी घाईघाईने फवारणी करून फवारणीचा खर्च वाढवू नये. बागेतील वाढलेले गवत काढून जमीन स्वच्छ करावी. हे काढलेले गवत भविष्यात जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडांच्या मुळाशी आच्छादन (मल्चिंग) म्हणून वापरावे.आंब्यावरील तुडतुड्यांच्या संरक्षणासाठी २.८ टक्के डेल्टामेथ्रिन ९ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. काजूवर ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ टक्के (६ मि.ली. प्रति १० लिटर पाणी) फवारणी करावी.वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता काढणीस तयार असलेली शिराळी, कारली, भेंडी, टोमॅटो, वांगी, मिरची आणि भोपळा पिकांची फळे तातडीने काढून घ्यावीत.ओलाव्याची संवेदनशील अवस्था असलेल्या भुईमूग, सुरु ऊस व हळद पिकाला गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

विजांच्या कडकडाटाच्या वेळी जनावरांना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत न बांधता पक्या गोठ्यात सुरक्षित ठिकाणी बांधावे.ऑक्टोबर हिट'मुळे जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे.वादळी वाऱ्यामुळे शेडमधील पक्षांना पाऊस व उष्णतेचा फटका बसू नये म्हणून शेडला बाहेरून ताडपत्री किंवा कापडी पडदे लावावेत. शेडच्या छतावर गवत किंवा गोणपात टाकून त्यावर पाणी शिंपडावे.​

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news