

कुडाळ : 26 जानेवारी 2025रोजीचा प्रजासत्ताक दिनी वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथील निर्मनुष्य बेटावर ध्वजारोहण करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. हा कार्यक्रम फक्त औपचारिकता नव्हता. शौर्य, चिकाटी आणि लोकसेवा यांचा संगम होता. या ध्वजारोहणाचे महत्त्व केंद्र सरकारने ओळखले असून, केंद्र सरकारच्या कॉफी टेबल बुक मध्ये हा कार्यक्रम समाविष्ट झाला आहे. ही फक्त निवती पोलिसांची उपलब्धी नाही, तर संपूर्ण निवती गाव, तालुका आणि राज्यासाठी ती अभिमानाची गोष्टआहे.
26 जानेवारी 2025 रोजी सकाळी निवतीचे सहा. पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड आणि कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहणाच्या तयारीला सुरुवात केली. निवतीपासून समुद्रात काही किलोमीटर आत असलेल्या ‘निवती दीपगृह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडकसदृश्य बेटावर पोहचणे सोपे नव्हते. त्या दिवशीओहटी होती, समुद्राची लाट अनिश्चित, हवामानही प्रतिकूल याचा विचार करता हा प्रयोग धाडसाचा ठरला. तरीही पोलिस टीमने खास बोटीने हा समुद्र प्रवास केला. बेटावर चढताना खडकांच्या सरळ उभ्या पृष्ठभागावर चढावे लागले. येथे प्रत्येक पावलावर धैर्याची कसोटी होती; मात्र पोलीस कर्मचारी आणि गावकऱ्यांची एकजूट आणि धैर्यपाहून हे ध्वजारोहण यशस्वी झाले.
निवती पोलिस स्थानकचे सहा. पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड म्हणाले, ओहटी आणि सहा फूट लाटा, अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही आम्ही ध्वजारोहण यशस्वी केले. हा कार्यक्रम आमच्या जिल्हा पोलिस आणि गावकऱ्यांसाठी गर्वाचा क्षण आहे. केंद्र सरकारने त्याची दखल घेतल्याने आनंद द्विगुणीत झाला. निवती बेटावर ध्वजारोहणाच्या या धाडसी मोहिमेने स्थानिक पोलिस जवानांची चिकाटी, धैर्य आणि देशभक्ती सिद्ध केली आहे. समुद्राच्या लाटांमध्ये उभे राहून फडकवलेला ध्वज, प्रतिकूल परिस्थितीतही पोलिसांच्या जिद्दीचा आणि गावकऱ्यांच्या सहकार्याचा प्रतीक बनला. हा ध्वजारोहण कार्यक्रम केवळ राष्ट्रीय प्रतीक नाही, तर प्रेरणादायी गाथा म्हणून पुढील पिढ्यांसाठी राहणार आहे.