

मालवण : महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात विकासकामांचा धडाका सुरु आहे. मालवण-कुडाळ मतदार संघाचा विचार करता मागील दहा वर्षात येथे काहीच झाले नाही. विकासाचा हा बॅकलॉग भरून काढत असताना महायुती सरकार, ख. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी मालवण-कुडाळ मतदारसंघात उपलब्ध झाला आहे. विकासाची ही गती अशीच कायम राहील. गावागावांत जनतेला अपेक्षित विकासकामे 100 टक्के पूर्ण करणार. असे प्रतिपादन आ. नीलेश राणे यांनी किर्लोस येथे केले.
महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शिरवंडे दलितवस्ती किर्लोस रस्त्यावरील गड नदीवर मोठ्या पुलाची उभारणी 8 कोटी 28 लाख निधीतून करण्यात आली आहे. या पुलाचे लोकार्पण आ. राणे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी परिसरात आ. राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आ. नीलेश राणे यांच्या हस्ते करून लोकार्पण सोहळा सुरु झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, कुडाळ तालुकाप्रमुख दादा साईल, माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, उद्योजक विनायक बाईत, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता धनंजय भोसले, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, गोठणे सरपंच दिप्ती हाटले, युवा उद्योजक प्रितम गावडे, मकरंद राणे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, महेश राणे, बाळा लाड, नीलेश बाईत, विभाग प्रमुख सुनील घाडीगावकर यांसह उप अभियंता श्रीमती काळे , निवेदक निलेश पवार व शिवसेना-भाजपा पदाधिकारी उपस्थिीत होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, आ. निलेश राणे यांनी आमदारकीच्या पहिल्या पाच महिन्यात शेकडो कोटी निधी आणला. बंधारे, रस्ते, पूल, नळपाणी योजना यासह मोठ्या प्रमाणात विकासकामे आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून होत आहेत. तर विधिमंडळ मध्ये आ. राणे यांचा अभ्यासूपणा जनतेने बघितला. ही विकासाची गती अशीच कायम राहील.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सिंधुदुर्गचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांच्या कामाचे विशेष कौतुक आ.नीलेश राणे, दत्ता सामंत यांनी केले. पुलासाठी मोफत जागा देणारे ग्रामस्थांचाही सत्कार करण्यात आला. बाळा लाड, राजू परुळेकर यांनी पुलाचा इतिहास व पूर्वीची स्थिती सांगितली.
पंतप्रधान ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनतेतून सर्व गावे जोडा. कोणताही गाव विकास मार्गापासून वंचित राहता नये. आमदार म्हणून की कमी पडणार नाही. आवश्यक असणारे सर्व सहकार्यसाठी मी सोबत आहे. जनतेला अपेक्षित असलेला विकास साध्य करणे हेच आपले प्रमुख लक्ष असल्याचे आ. नीलेश राणे म्हणाले.