Sindhudurg News : बनावट सही प्रकरणातील ‘त्‍या’ गॉडफादरवरही कारवाई करा

उत्तम लोके : संबंधित ठेकेदार काळ्या यादीत का नाहीत?
उत्तम लोके
उत्तम लोके
Published on
Updated on

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागात खोट्या सह्या करून बिले उकळणाऱ्या ठेकेदारांवर गुन्‍हा दाखल झाला आहे, परंतु ही बाब फेब्रुवारीमध्ये उघडकीस येऊनही तीन महिने का लागले? हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्‍न प्रशासन करत होते. पालकमंत्र्यांनी या प्रकरणी खोट्या सह्या मारणाऱ्यांचा कुणीतरी गॉडफादर असल्‍याचे सांगितले होते. या प्रकरणाची दखल घेतल्‍याबद्दल पालकमंत्र्यांचे अभिनंदन, परंतु या प्रकरणी जो कोणी गॉड फॉदर आहे त्‍याचीही चौकशी करून कठोर कारवाई व्‍हावी, अशी मागणी ठाकरे युवासेना कणकवली तालुका प्रमुख उत्‍तम लोके यांनी केली. संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत का टाकले नाही? असा सवालही त्‍यांनी केला.

कणकवलीतील शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्‍तम लोके म्‍हणाले, जिल्हा परिषदमध्ये ठेकेदारांनीच खोट्या सह्या मारुन बिले काढल्याचा प्रकार फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आला. या प्रकारात पाच जणांवर गुन्हे दाखल झाले असून, हा प्रकार कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आहे. या प्रकरणात प्रशासनावर वचक ठेवण्याचा प्रयत्न कोण करत आहे? याची माहिती सर्वांना आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यानंतरही संबंधितांना कोणाचा पाठिंबा आहे, याची चौकशी झाली पाहिजे. कारण काहीजण त्या ठेकेदारांना आपल्या कारमधून घेवून फिरत असल्याचा आरोप उत्तम लोके यांनी केला.

ते म्‍हणाले, या प्रकरणामागे कोणाचा हात आहे, कोण ‘गॉड फादर’ आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. गुन्‍हा दाखल झालेल्‍या संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच जिल्हा परिषदेमधील कामांपासून त्यांना दूर ठेवावे. गुन्हे दाखल पाच ठेकेदारांच्या कामांची सखोल चौकशी करावी. त्यांनी कोणत्या भागात कामे केली आहेत, याची तपासणी करावी. खोट्या सह्या करून कामे करणाऱ्यांना पुन्हा शासकीय कामांची परवानगी मिळता कामा नये. त्यांना जिल्हा परिषदमध्ये येताना अटकाव केला पाहिजे , नाहीतर कामांमध्ये असाच घोळ करतील. तसेच त्‍यांनी खोट्या सह्या करून जी बिले काढली ती कामे पूर्ण झाली का? त्‍याचीही चौकशी झाली पाहिजे. आमदार फंडातून झालेली अनेक कामे निकृष्ट आहेत, मग त्‍यांची बिले कशी पास झाली? असा सवालही उत्‍तम लोके यांनी केला. या प्रकरणी गॉड फादरवर कारवाई न झाल्‍यास शिवसेना आंदोलन करेल असा इशारा त्‍यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news