

कुडाळ : झाराप तिठा ते माणगाव जाणाऱ्या रस्त्यावर मध्यरात्री एक तरुणी एकटीच झोपलेल्या अवस्थेत आढळून आली. ही माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करून संबंधित तरुणीला सुरक्षित आश्रय उपलब्ध करून दिला.
२० जून रोजी पहाटे सुमारे २.५५ वा.च्या सुमारास झाराप तिठा परिसरात एका महिलेबाबतची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यात मिळाली. प्रकरण महिला संदर्भातील असल्याने ठाणे अंमलदार महिला पोलिस हवालदार वेदिका गावडे यांनी तत्काळ दखल घेत कारवाई केली. कुडाळ पोलिस ठाण्यातील रिझर्व तपासी अंमलदार एएसआय श्री.कोळेकर व पोलिस कर्मचारी श्री. चव्हाण यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता, सुमारे २० वर्षीय तरुणी रस्त्याच्या कडेला एकटी झोपलेल्या अवस्थेत आढळून आली.
प्राथमिक विचारपूस केली असता संबंधित तरुणीकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळाली नाही. त्यामुळे तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिला कुडाळ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांनी पुढील चौकशी केली असता तिने स्वतःची ओळख सांगितली. संबंधित तरुणीचे दोन वर्षांपूर्वी विवाह झाल्याचे तसेच ती सध्या पती व आई-वडिलांसोबत गोवा येथे राहत असल्याचे समोर आले. तिने कौटुंबिक कारणांमुळे आणि सतत होत असलेल्या त्रासामुळे तेथे राहण्याची इच्छा नसल्याचे पोलिसांना सांगितले.तरुणीची परिस्थिती लक्षात घेऊन तिच्या निवारा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत तिला महिला वस्तीगृहात दाखल केले. या संपूर्ण घटनेत कुडाळ पोलिसांनी संवेदनशीलता आणि तत्परता दाखवत संबंधित तरुणीला सुरक्षित आश्रय उपलब्ध करून दिला.