Omkar Elephant : ‘ओंकार’ हत्तीचे पुन्हा दोडामार्ग तालुक्यात पुनरागमन!

शेतकरी, बागायतदार धास्तावले
Omkar Elephant
‘ओंकार’ हत्तीचे पुन्हा दोडामार्ग तालुक्यात पुनरागमन!
Published on
Updated on

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळणारी घटना समोर आली आहे. गेले अनेक महिन्यांपासून तालुक्याबाहेर गेलेला ‘ओंकार’ हत्ती पुन्हा दोडामार्गच्या हद्दीत दाखल झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील बांदा, वाफोली परिसरात वावरत असताना या हत्तीने अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा उद्ध्वस्त केल्या होत्या. मात्र आता वनविभागाने जाणीवपूर्वक या हत्तीला पुन्हा दोडामार्गच्या दिशेने हुसकावून लावल्याचा आरोप तळकटचे सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले यांनी केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यात वन्य हत्तींचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीने फुललेल्या बागायती, पिके यांसह जनजीवन या हत्तींच्या वावरामुळे अक्षरशः उद्ध्वस्त होत आहे. अनेक कुटुंबांना रात्रभर जागून आपल्या शेतांचे रक्षण करावे लागत आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातून बाहेर गेलेला ओंकार हत्ती पुन्हा परतल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सावंतवाडी तालुक्यात हत्तींचा वावर झाला की तातडीने हालचाली होतात आणि त्यांना तेथून हटवले जाते. मात्र त्याच हत्तींना दोडामार्गच्या दिशेने वळवले जाते. जर इतर तालुके हत्तींचा त्रास सहन करू शकत नाहीत, तर दोडामार्गवासीयांनीच नेमका कोणता अपराध केला आहे की वर्षानुवर्षे हा त्रास सहन करावा? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

कायमस्वरुपी उपायोजना करा

त्यांनी पुढे म्हटले की, वनविभागाने हत्तींच्या प्रश्नाकडे केवळ स्थलांतराच्या दृष्टिकोनातून न पाहता कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. एका तालुक्यातील समस्या दुसऱ्या तालुक्यावर ढकलणे हा कोणत्याही परिस्थितीत उपाय ठरू शकत नाही. यामुळे दोडामार्गातील शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.

आणखी किती संकटांचा सामना करायचा

ओंकार हत्तीच्या पुनरागमनामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुन्हा एकदा धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणे, बागायतींची पाहणी करणे किंवा घराबाहेर पडणे देखील धोकादायक ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आधीच मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे गेलेल्या शेतकऱ्यांना आता आणखी संकटांचा सामना करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोडामार्गातील शेतकरी व ग्रामस्थांनी वनविभागाकडे अनेकदा निवेदने देऊन हत्तींवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात निर्णायक उपाययोजना होत नसल्याने लोकांमध्ये असंतोष वाढत असल्याचा आरोप सुरेंद्र सावंत-भोसले यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news