Sindhudurg News : विर्डी धबधब्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह तीन दिवसांनी बाहेर काढण्यात यश

पाण्याचा प्रवाह रोखत मृतदेह काढला बाहेर
Sindhudurg  News
विर्डी धबधब्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह तीन दिवसांनी बाहेर काढण्यात यश
Published on
Updated on

दोडामार्ग : विर्डी येथील वझर सखल धबधब्याच्या खोल जलकुंडात गुरुवारी बुडून बेपत्ता झालेल्या कर्नाटकातील धरवाड येथील युवकाचा मृतदेह अखेर शनिवारी तिसऱ्या दिवशी बाहेर काढण्यात आला. सह्याद्री ॲडव्हेंचर आणि रेस्क्यू टीमने सलग तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विजय दोडमणी (२३) याचा मृतदेह खोल डोहातून बाहेर काढला. मृतदेह बाहेर आल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराचा दुःखाचा बांध फुटला. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

कर्नाटकातील धरवाड येथील सात युवक मौजमजा आणि धबधब्यात आंघोळ करण्यासाठी विर्डी येथील वझर सखल धबधब्यावर आले होते. गुरुवारी दुपारी अंघोळ करत असताना विजय दोडमणी हा युवक अचानक खोल जलकुंडात गेला आणि पाण्यात बुडून बेपत्ता झाला. त्यानंतर स्थानिकांनी आणि प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली; मात्र सुरुवातीला त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.

विजय दोडमणी याने बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो चालक म्हणून काम करायचा. त्याचे वडील भाडेतत्त्वावर रिक्षा चालवतात. विजयचे लग्न ठरले होते व अवघ्या एक महिन्यावर लग्नाचा मुहूर्त होता. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते.

दरम्यान, शुक्रवारी सिंधुदुर्गातील सह्याद्री ॲडव्हेंचर आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. धबधब्याखालील अतिशय खोल आणि धोकादायक डोहात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोधकार्य सुरू करण्यात आले.सुमारे एक तासाच्या शोधानंतर ड्रोनच्या मदतीने मृतदेहाचा मागोवा घेण्यात टीमला यश आले. त्यानंतर उपलब्ध साधनसामग्रीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र डोहाची खोली, पाण्याचा वेगवान प्रवाह आणि सायंकाळी वाढणारा अंधार यामुळे मोहीम थांबवावी लागली. शनिवारी स. ९:३० वाजता रेस्क्यू ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यात आले. खोल पाण्यात उतरून तसेच विशेष उपकरणांच्या मदतीने शोधकार्य वेगाने सुरू ठेवण्यात आले. धबधब्याच्या तीव्र प्रवाहामुळे मृतदेहापर्यंत पोहोचणे आणि तो सुरक्षितरीत्या बाहेर काढणे मोठे आव्हान ठरत होते. मात्र रेस्क्यू टीमने चिकाटी न सोडता प्रयत्न सुरू ठेवले आणि तब्बल तीन तासांच्या संघर्षानंतर दु.१२:३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news