

वेंगुर्ले : कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो हिरवागार शालू परिधान केलेला निसर्ग. खळखळ वाहणाऱ्या नद्या, स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे. हे पाहण्यासाठी यंदा हजारो पर्यटक सिंधुदुर्ग किनाऱ्यावर आले. वेंगुर्ले बंदर येथील झुलता पूल मात्र पर्यटनाचा हॉटस्पॉट बनला आहे.
विशेषतः कोकणला पर्यटनदृष्ट्या प्राधान्य मिळत आलेलं आहे. मागील काही वर्षांपासून कोकणात या पर्यटनामध्ये भर घालणारे अनेक प्रकल्प राबवले गेले. विशेषतः आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल विचार केला, तर मार्चअखेर ते जूनचा पहिला आठवडा हा काळ पर्यटकांनी गजबजलेला असतो. या काळामध्ये पर्यटनदेखील जोमात सुरू असते. मागील काही वर्षांपासून वेंगुर्ले तालुक्यात अनेक विकसित प्रकल्प राबविण्यात आले. ज्यामुळे वेंगुर्लाच्या सौंदर्यात आणि पर्यटनात भर पडली. सध्या वेंगुर्लेमध्ये पर्यावरण पर्यटन आणि पायाभूत सुविधांवर भर देणारे अंडरवॉटर टुरिझम, ताज हॉटेल, वेंगुर्ले बंदर विकास, वनस्पती संवर्धन प्रकल्प असे अनेक प्रकल्प सुरू आहेत.
२९ जानेवारी २०२३ मध्ये वेंगुर्ले बंदर इथं झुलत्या पुलाची उभारणी करण्यात आली. कोकणातील हा पहिलाच झुलता पूल असून वेंगुर्ला बंदर ते नवाबाग समुद्रकिनाऱ्याला जोडणारा हा एक महत्त्वाचा पर्यटन दुवा आहे. या पुलावरून सभोवतालचा अथांग समुद्र, खाडी आणि आजूबाजूच्या हिरवळीचं विहंगमय दृश्य दिसत. हा पूल अतिशय आकर्षक असून पर्यटक येथे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी खास करून रिल्स बनवण्यासाठी प्राधान्य दिलं जातं.
एकूणच पर्यटनात वाढ, स्थानिकांना रोजगार, शहराच्या सौंदर्यात वाढ, आर्थिक लाभ म्हणजे थोडक्यात वेंगुर्ले शहराच्या विकासाच्या दृष्टीने झुलत्या पुलाची उभारणी हे महत्त्वाचे पाऊल ठरलय.
सुंदर समुद्र किनाऱ्याची साथ लाभलेल्या वेंगुर्ल्याच्या सौंदर्यात आणि पर्यावरणाच्या वाढीमध्ये खरोखरच या पुलामुळे भर पडली. लहानांपासून थोरांपर्यंत असंख्य पर्यटक या झुलत्या पुलावर पर्यटनाचा, सेल्फी घेण्याचा, उंटांवरून सफारी करण्याचा, बोटिंग करण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. झुलत्या पुलाशेजारी उभारण्यात आलेले निरनिराळे खाऊचे स्टॉल पर्यटकांची खाण्यापण्याची सोय तर करतातच पण या स्टॉलमुळे स्थानिकांच्या रोजगारामध्ये आणि उत्पन्नामध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळते. एकूणच ज्या उद्देशाने या पुलाची उभारणी करण्यात आली आहे तो हेतू सफल होताना दिसतोय.