

वैभववाडी : तळेरे-वैभववाडी राष्ट्रीय महामार्गावरील कोकिसरे येथील नारकरवाडी परिसरातील धोकादायक वळणावर गुरुवारी दुपारी ट्रक उलटून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली, तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
ट्रक चालक आकाश शिव राठोड (२१, रा. कर्नाटक) हा तळेरे ते वैभववाडी येत होता. गुरूवारी दुपारी १ वा.च्या सुमारास कोकिसरे- नारकरवाडी येथील अवघड वळणावर त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.या दुर्घटनेत चालकासह अन्य कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र ट्रकचे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, हवालदार श्री. माने तसेच महिला पोलीस श्रीमती गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल चालक आकाश राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.