Sindhudurg News : ‘स्मार्ट मीटर’ची जबरदस्ती खपवून घेणार नाही!

महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयावर ठाकरे शिवसेनेची धडक
Sindhudurg News
कुडाळ : अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्याशी चर्चा करताना वैभव नाईक. सोबत अमरसेन सावंत, अतुल बंगे, बाळा पावसकर, कृष्णा धुरी व अन्य.
Published on
Updated on

कुडाळ : महावितरणकडून घरोघरी बसविण्यात येणारे स्मार्ट मीटर, वाढीव वीज बिले, धोकादायक भूमिगत वीज वाहिन्या यांसह विविध वीज प्रश्नांबाबत गुरूवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली व अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यां जाब विचारला. स्मार्ट मीटरसाठी जिल्ह्यातील वीज ग्राहकांना जबरदस्ती करू नये, अन्यथा गाठ ठाकरे शिवसेनेशी आहे, असा इशारा माजी आ.वैभव नाईक यांनी दिला.

उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, तालुकासंघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख तथा पं.स.सदस्य योगेश धुरी, नेरूर विभाग प्रमुख शेखर गावडे, बाळा पावसकर, सुशिल चिंदरकर, अमित राणे, गोट्या चव्हाण, गुरू गडकर, शैलेश काळप आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

वैभव नाईक व पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर सक्तीबाबत अभियंत्यांना धारेवर धरले. लोकांवर अदानी कंपनीच्या स्मार्ट मीटरची जबरदस्ती केली जात असल्याने महावितरणचे अधिकारी अदानी कंपनीचे काम करतात का? असा सवाल वैभव नाईक यांनी केला. त्यावर अधीक्षक अभियंत्यांनी सदर मीटर केवळ अदानी कंपनीचे नसून, विविध चार कंपन्यांचे आहेत. फक्त या मीटरची जोडणी अदानी कंपनीकडून होत आहे. आपण अदानींचा सेवक नसून शासन व जनतेचा सेवक आहे, शासन व महामंडळाकडून आम्हाला १०० टक्के ‘स्मार्ट मीटर’ जोडणीचे टार्गेट आहे, असे श्री. राख यांनी सांगितले

अधीक्षक अभियंत्यांच्या या उत्तरानंतर वैभव नाईक म्हणाले, जर चार कंपनीचे मीटर असतील तर लोकांना याची माहिती द्यावी, जेणेकरून आपल्याला हवे त्या कंपनीचे मीटर पसंत करतील. पण महावितरणने ग्राहकांवर ‘स्मार्ट मीटर’ची कोणत्याही प्रकारे सक्ती करू नये. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूमिगत वीज वाहिन्या रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असून, त्याबाबत तातडीने उपाययोजना करावी,पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेऊन ग्राहकांना अखंडित वीज सेवा द्यावी आदी मागण्या केल्या.

अधीक्षक अभियंत्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या शिष्टमंडळाने आज महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली. महावितरणकडून ग्राहकांच्या संमतीशिवाय बसविण्यात येणारे स्मार्ट वीज मीटर व वाढीव बिलांसंदर्भात अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करण्यात आली. खरंतर अदानी कंपनीच्या स्मार्ट मीटरबाबत लोकांच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत. तरीही सरकारच्या जबरदस्तीमुळे महावितरणकडून हे मीटर बसविले जात आहेत. प्रशासनावर राज्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे, हे अधीक्षक अभियंत्याच्या या भेटीत स्पष्ट झाले. टार्गेटप्रमाणे हे मीटर बसवले नाही तर अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. म्हणजेच सरकार एकीकडे माहिती देते की स्मार्ट मीटर कंपल्सरी नाहीत आणि दुसरीकडे वीज अधिकाऱ्यांना मीटर बसवण्याचे टार्गेट देऊन कारवाई केली जाते. त्यामुळे स्मार्ट मीटरबाबत सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचे स्पष्ट होत आहे.

एकीकडे चार मीटरचे पर्याय आहेत, म्हणजेच चार कंपनीचे मीटर ग्राहक पसंत करू शकतात, तसेच वायरमनने स्वतःहून मीटर बसवायला जायचे नाही, असा आदेश असताना सुद्धा ते बसवायला जात आहेत. याकडेही अधीक्षक अभियंत्यांचे आम्ही लक्ष वेधले असता, यापुढे वायरमन मीटर बसविण्यास जाणार नाही. फक्त अदानी कंपनीचे लोकच जातील आणि ते सुद्धा लोकांवर जबरदस्ती करणार नाहीत असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे. जर कोणी यापुढे स्मार्ट मीटर बाबत ग्राहकांना जबरदस्ती केली तर ठाकरे शिवसेनेशी गाठ आहे, हे महावितरणने लक्षात घ्यावे, असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news